'आता मला काहीच नको, मुलांच्या कर्तृत्वावर मी समाधानी'

निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त खा. नारायण राणे भावूक
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 18, 2026 17:42 PM
views 108  views

कुडाळ : "आजवर मी १० राजकीय पदे भूषवली, आयुष्यात जे हवे होते ते सर्व मिळवले. आता मला कशाचीही अपेक्षा नाही. माझ्या दोन्ही मुलांनी - निलेश आणि नितेशने - आई-वडिलांना जे अपेक्षित होते, ते सर्व साध्य केले आहे. त्यांची भाषणे आणि जनसेवेची तळमळ पाहून मी आज पूर्णतः समाधानी आहे," असे भावूक उद्गार खासदार नारायण राणे यांनी काढले. आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

गेल्या महिन्याभरापासून प्रकृती ठीक नसतानाही, केवळ कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे राणे यांनी आवर्जून सांगितले. "माझी प्रकृती बरी नव्हती, पण जेव्हा कार्यकर्त्यांनी विचारले की तुम्ही येणार का? तेव्हा मी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. कार्यकर्त्यांनी केवळ 'दादा' म्हणून मारलेली हाक मला ऊर्जा देते. तुम्हाला भेटल्यानंतर माझे निम्मे आजारपण दूर होते," अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते व्यक्त केले.

जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना खासदार राणे म्हणाले की, "आम्ही या जिल्ह्याकडून काही घ्यायला नाही, तर जिल्ह्याला भरभरून द्यायला आलो आहोत. सिंधुदुर्गातील जनता सुखी, समाधानी आणि आनंदी राहावी, हेच आमचे एकमेव ध्येय आहे. निलेश आणि नितेशला मी नेहमी सांगतो की, दिवस-रात्र काम करा आणि केवळ जनतेचा आशीर्वाद मिळवा."

आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी नमूद केले की, जनतेसाठी आयुष्य वेचणारे लोकप्रतिनिधी आजच्या काळात दुर्मिळ आहेत. "निलेशची भाषणे मी स्वतः ऐकली आहेत, त्यातून त्याची कामाप्रती असलेली निष्ठा दिसून येते. माझ्या दोन्ही मुलांना आपले आशीर्वाद कायम असू द्यावेत," असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले.