
देवगड : दीक्षित फाउंडेशनचे गेली तीन ते चार वर्षे तालुक्यामध्ये विविध क्षेत्रात चालू असणारे कार्य हे सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आहे. असे गौरवोद्गार ॲड. अविनाश माणगावकर यांनी दीक्षित फाउंडेशन आणि शिक्षण विभाग देवगड आयोजित इयत्ता चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यक्त केले. शेठ म.ग.हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख सुदाम जोशी, देवगड हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षांचा लाभ घ्यावा. शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने करावेत. पालकांनी आपल्या पाल्यास योग्य वेळी योग्य मार्गदर्शन द्यावे. दीक्षित फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहे. या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होत आहे. दीक्षित फाउंडेशन चे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी ठरत आहे. असे मत कार्यक्रमाचे उद्घाटक ॲड. अविनाश माणगावकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे निवेदन आणि आभार शिक्षिका श्रीमती दीपिका जांबवडेकर यांनी केले. या शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी प्रभागातील एकूण १५६ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते.











