
मालवण : गोळवण धवडकीवाडी येथील रघुनाथ चेंदवणकर यांच्या घराचा बनावट घरपत्रक उतारा बनविण्यात आला आहे. विद्यमान सरपंच सुभाष लाड यांनी बनावट घरपत्रक उतारा बांगलादेशी मुसलमान असलेल्या समद किताबुल्ला चौधरी याच्या नावावर बनवून दिला आहे. यात सरपंचांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केली आहे. याप्रकरणी आपण तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करत दोषीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे अशी माहिती सजीत चेंदवणकर यांनी दिली आहे.
तक्रारीत चेंदवणकर यांनी म्हटले आहे की, गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता क्रमांक ५३५ ही आमच्या सामाईक मालकीची आहे. हे घर आपला भाऊ रघुनाथ चेंदवणकर यांच्या नावे आहेत. हे घर आम्ही नंदादीप नाईक यांच्याकडे देखरेखीसाठी दिले होते मात्र हे घर त्यांनी कोणाला भाड्याने दिले याची आम्हाला माहिती नंदादीप नाईक हे आमच्या अति जवळचे विश्वासू असल्याने त्यांना याबाबत कधीही विचारणा झाली नाही. मात्र या महिन्यात सोशल मीडियावर गोळवण ग्रामपंचायत हद्दीत आमच्या मालमत्तेचा गैरवापर झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर आम्ही काही गावातील लोकांशी संपर्क साधला असता हे सत्य असल्याचे समजले. आमच्या घर पत्रकाचा फेरफार बदलून ज्या व्यक्तीचा गावाशी कोणताही संबंध नाही अशा समद किताबुल्ला चौधरी याच्या नावे सरपंचांनी मालमत्ता केली त्याचे कारण अद्याप समजलेले नाही. आम्ही नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असल्याने आमचे गावी येणे जाणे कमी असते. सरपंचांनी आमची मालमत्ता समद चौधरी यांच्या नावे केल्यामुळे त्याने या गोष्टींचा गैरवापर करून रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक कार्ड तसेच बँक खाते उघडले आहे.
रेशनकार्ड बनवण्यासाठी आणि इतर शासकीय कामासाठी उत्तर प्रदेश मधील काही शासकीय दस्तावेज त्याने जोडले आहेत. त्यांनी जी कागदपत्रे जोडली आहेत ती बोगस आहेत. येथील पुरवठा शाखेत नवीन केशरी रेशन कार्ड बनवले असून त्यावर तहसीलदारांची स्वाक्षरी झाली आहे याबाबतची कागदपत्रे ही वराड येथील ई-सेतू सेवा केंद्रातून तहसील कार्यालयात सादर केल्याची माहिती मिळाली आहे. तरी हे रेशन कार्ड रद्द करण्यासाठी सखोल चौकशी करून संबंधित शासकीय यंत्रणा तसेच सरपंचांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणीही श्री. चेंदवणकर यांनी केली आहे.