नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य हत्तींचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी थेट नागपूर येथे राज्याचे प्रधान सचिव माहीत शुक्ला व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या या बैठकीत वन्य हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना, सिंधुदुर्ग जिल्हयात वन पर्यटन विकसित करणे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मंत्री महोदयांनी राज्याच्या वनाधिकाऱ्याना महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
यात सध्या जिल्ह्यात शेतकरी व नागरिकांना अत्यंत महत्वाची समस्या असलेल्या हत्ती प्रश्नी मंत्री केसरकर यांनी केरळच्या धर्तीवर हत्तींपासून संरक्षणासाठी टोकदार खिळ्यांची संरक्षक भिंत उभारण्याची उपाययोजना याठिकाणी करण्यासाठी आवश्यक 'मास्टर प्लॅन' करण्याची सूचना दिल्या आहेत. तर जिल्ह्यात वाढत्या वाघांचे हल्ले रोखण्यासाठी येत्या महिना भरात मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सध्या ६ हत्तींचा उपद्रव सुरू आहे. गेले तीन महिने या उपद्रवात कमालीची वाढ झाली असून या हत्तींनी दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, केर, हेवाळे - बांबर्डे, आयानोडे शिरंगे येथे मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून दोन हत्तींचा कळप मोर्ले व केर येथेच ठाण मांडून आहे.
या पार्श्वभूमीवर तिलारी खोऱ्यातील सरपंच यांनी एकवटत वन्य हत्ती बंदोबस्ताची अलीकडे जोरदार मागणी केली होती. त्या अनुषंगाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी थेट नागपूर येथे वन्यजीव विभागाचे प्रधान सचिव माहीत गुप्ता यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत मंत्री केसरकर यांनी तिलारी खोऱ्यातील वन्य हत्तींचा उपद्रव अधोरेखित करताना वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना हत्तींपासून संरक्षणासाठी खास मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचना दिली. इतकच नव्हे तर केरळ राज्यात हत्तींपासून संरक्षणासाठी तेथे राज्य सरकार व वन विभागाने लोखंडी खिळांच्या संरक्षक भिंती उभारून वन्य हत्तींना ज्या पद्धतीने पायबंद घातला तशाच उपाय योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर याच बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघ, बिबटे यांचा वाढता संचार रोखण्यासाठी सुद्धा येत्या महिनाभरात नियोजन करून ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मानवी वस्तीत व पाळीव जनावरांना हल्ले करणाऱ्या या वाघ बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात हलविण्याच्या नियोजन करण्यात यावे व प्रत्यक्ष मोहीम राबविण्यात यावी हे काम पावसाळ्यापूर्वी झाले पाहिजे अशा सप्त सूचना मंत्री केसरकर यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी सी. श्रीलक्ष्मी व वन अधिकाऱ्यांना दिले आहे.
सिंधुदुर्गात वन पर्यटनास चालना
देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेला सिंधुदुर्ग व विपुल नैसर्गिक साधन संपत्ती असलेल्या जिल्ह्यातील पर्यावरणाला चालना मिळावी यासाठी वनविभागाने पर्यावरण पूरक फॉरेस्ट टुरिझम अंतर्गत वन पर्यटन साठी सुद्धा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. आंबोली धबधबा, तीलारीत वॉटर स्पोर्ट असे वन पर्यटन विकसित करण्यासाठी प्लॅन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एकूणच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतील राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर थेट राज्य राज्याच्या वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्ती प्रश्न, व्याघ्र प्रश्न व वन पर्यटनाला चालना देण्याच्या घेतलेली बैठक निश्चितच सिंधूदुर्ग वासियांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. या बैठकीला राज्याचे प्रधान सचिव माहीत गुप्ता यांचे सह अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक भूपेंद्रसिंग हुडा, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या फिल्ड डायरेक्टर सी. श्रीलक्ष्मी व पेंच व्याघ्र प्रकल्पाचे डेप्युटी डायरेक्टर प्रभुनाथ शुक्ला हे वरिष्ठ वनअधिकारी उपस्थित होते.