
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसी परिसरातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्पास तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सांगितले. स्थानिकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे आडाळीचे सरपंच पराग गांवकर यांना दिले.
ही चर्चा आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आयोजित केली होती. मंत्री सामंत आणि सरपंच गांवकर यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली. यापूर्वी मंत्री सामंत यांनी आडाळी एमआयडीसीत गोल्फ व हॉटेल प्रकल्प प्रस्तावित असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आडाळी औद्योगिक क्षेत्र कृती विकास समितीने या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवून “गोल्फ नव्हे, उद्योग आणा” अशी मागणी जोरात लावून धरली. समितीच्या या मागणीची अखेर दखल घेत मंत्री सामंत यांनी आजची चर्चा घडवून आणली.
चर्चेदरम्यान सरपंच पराग गांवकर यांनी, आडाळीत ज्या उद्योजकांना भूखंड मंजूर झाले आहेत त्यांना पुढील प्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी, तसेच गोल्फ–हॉटेल प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन देऊ नये, अशी भूमिका मांडली. त्यावर प्रतिसाद देताना मंत्री सामंत यांनी प्रकल्पाची कार्यवाही तात्काळ स्थगित करण्याचे आणि कृती समितीसोबत चर्चेनंतरच पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या भूमिकेची दखल घेतल्याबद्दल पराग गांवकर यांनी मंत्री सामंत, आमदार केसरकर आणि संजू परब यांचे आभार मानले. “आडाळीत उद्योग यावेत यासाठी संघर्षाऐवजी समन्वयाची भूमिका ठेवू,” असेही त्यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान समितीचे सचिव प्रवीण गांवकर आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
आडाळीत उद्योग आणण्यासाठी विशेष प्रयत्न : संजू परब
आडाळी कृती समिती अनेक वर्षांपासून उद्योग उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. त्यांची भूमिका योग्य असल्याचे सांगून, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या समन्वयातून आडाळीत उद्योग आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्पष्ट केले.
“रोजगाराचा प्रश्न ज्वलंत असून स्थानिकांचे स्थलांतर थांबवण्यासाठी उद्योग उभारणी आवश्यक आहे. शिवसेना याविषयी आग्रही राहील,” असेही त्यांनी सांगितले.













