सुप्रसिद्ध साहित्यिक राम मेस्त्री यांना डॉक्टरेट प्रदान

Edited by:
Published on: January 15, 2025 13:14 PM
views 57  views

मुंबई : कोकणचे प्रसिद्ध साहित्यिक राम मेस्त्री यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी (यूएसए) या विश्वविख्यात विद्यापीठाकडून मराठी साहित्यातील विशेष योगदानाबद्दल डॉक्टरेट इन् मराठी लिटरेचर ही मानाची पदवी बहाल केली आहे. चेन्नई (मद्रास) येथील एगमोअर येथे पंचतारांकित हॉटेल रमाडा येथे हा भव्यतम सोहळा पार पडला.

व्यासपीठावर विद्यापीठाचे महनीय पदाधिकारी, शिक्षण, साहित्य, विज्ञान, चित्रपट, ऊर्जा, पुरातत्व, नृत्य, काव्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवर सोहळ्यास उपस्थित होते. भारतीय चित्रपट सृष्टीचे महान तमिळ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते चिन्नी जयनाथ यांनी राम मेस्त्री यांना डॉक्टरेट इन् मराठी लिटरेचर ही मानाची पदवी मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल केली.

साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी (यूएसए) या विश्वविख्यात विद्यापीठाच्या डॉक्टरिअर मॉनिटरिंग बोर्ड यांच्याकडून  राम मेस्त्री यांच्या तीस वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीची छाननी केली गेली. त्यात त्यांची एकूण लिहिलेली 31 पुस्तके, प्रिंट प्रकाशित 20 पुस्तके, प्रकाशनाच्या वाटेवरील पुस्तकांची हस्तलिखिते यांची छाननी करण्यात आली.

तसेच, राम मेस्त्री यांच्या पुस्तकांवर प्रस्तावना, अभिप्राय, लेखन करणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. मधु मंगेश कर्णिक, गोवा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सोमनाथ कोमरपंत, मराठी चित्रपट आणि साहित्य क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे, अध्यात्मिक संशोधक साहित्याचे प्रणेते, पंचम खेमराज कॉलेजचे उपप्राचार्य पीएचडीचे मार्गदर्शक प्रा. डॉ. गंगाधर बुवा, ज्येष्ठ सुप्रसिद्ध ललित साहित्यिक रवींद्र पिंगे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक ग. गो. राजाध्यक्ष (बेळगाव), ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार प्राचार्य विद्याधर भागवत, वराडकर कॉलेज दापोलीचे ज्येष्ठ साहित्यिक समीक्षाकार प्रा. मुकुंद पेंडसे, महाराष्ट्र राज्याचे माजी संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई आणि ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र धोंगडे, सिने दिग्दर्शक आणि सिनेगुरू विकास देसाई (चित्रपती व्ही. शांताराम यांचे जावई), ज्येष्ठ कादंबरीकार अनंत तिबिले (कोल्हापूर), मालिका, सिने - नाट्य दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर आदी मान्यवरांच्या राम मेस्त्री यांच्या साहित्यावर लिहिलेल्या प्रस्तावना, अभिप्राय यांचा समग्र आणि सखोल अभ्यास विद्यापीठाच्या डॉक्टर मॉनिटरिंग बोर्डाकडून करण्यात येऊन मंजुरीसाठीचा प्रस्ताव ॲकॅडेमिक कमिटीसमोर ठेवण्यात आला.

साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी यूएसएच्या ॲकॅडेमिक कमिटीने राम मेस्त्री यांच्या मराठी साहित्यातील कार्य कर्तृत्वाचा सन्मान म्हणून डॉक्टर इन मराठी लिटरेचर हा बहुमान राम मेस्त्री यांना जाहीर केला. हा बहुमान प्राप्त होणे म्हणजे माझ्या आयुष्याचे सोने व्हावे, ही कृतज्ञतापूर्वक भावना राम मेस्त्री यांनी यप्रसंगी व्यक्त केली.