जिल्हा बँकेच्या 'अबोली रिक्षा योजने'ने आता महिला बनणार स्वयंसिद्धा !

सौ. नीलमताई राणे यांच्या हस्ते ४ महिलांना देण्यात आल्या पिंक रिक्षेच्या चाव्या | आ. नितेश राणे, प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: March 18, 2023 19:39 PM
views 199  views

सिंधुदुर्ग : आत्मविश्वास हा जीवनात महत्वाचा असतो. पिंक रिक्षेच्या माध्यमातून महिलांनी आत्मविश्वासाने व्यवसाय करावा. जिल्ह्यातील मुली महिलांपेक्षा जास्त शिकलेल्या आहेत. त्यांनी पुढे येत जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेवून स्वालंबी बनावं, उद्योजक व्हावं, असे आवाहन जिजाऊ महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 'अबोली रिक्षा योजने,च्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.


सिंधुदुर्गनगरी येथील बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील चार जणींना कर्ज प्रकरण मंजुरीचे कागदपत्र व रिक्षेची चावी देवून सौ. राणे यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार व बँकचे संचालक नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, सौ. जठार, संचालक विठ्ठल देसाई, निता राणे, समीर सावंत, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, प्रकाश मोर्ये, डॉ प्रसाद देवधर, भाजप महिला मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष संधा तेरसे, सायली सावंत, मेघा गांगण, रुपा रावराणे, सायली सावंत, सुप्रिया वालावलकर, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना आमदार राणे यांनी डॉ. देवधर यांची ही संकल्पना असल्याचे आवर्जून सांगितल. महिलांच्या दोन हाताला काम मिळाले पाहिजे, महिला स्वयंसिद्ध बनल्या पाहिजेत म्हणूनच जिल्हा बँकेने ही योजना आणली. आम्ही सर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे जलदगतीने निर्णय

घेण्याची आम्हाला शिकवण आहे. महिलांचे राज्यातील पहिले भवन आपल्या आई नीलम राणे यांनी ओसरगाव येथे सुरू केले, ही राणे साहेबांची दूरदृष्टी आहे. जिल्ह्यातील अकरा लाख लोकसंख्येत साडेपाच लाख महिला आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांच्या दोन्ही हाताला काम देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जशा सरपंच मेळाव्यात ५० टक्के महिला सरपंच असतात. त्याप्रमाणे यापुढें रिक्षा व्यावसायिक मेळावा घेतल्यास त्यात ५० टक्के महिला रिक्षा चालक दिसल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केवळ कर्ज मंजूर करून न थांबता पुढे हा व्यवसाय करताना काहीअडचण आल्यास आम्हाला जरूर सांगा त्यासाठीही सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच पिंक रिक्षेसाठी अबोली रिक्षा योजनेतून कर्ज घेतलेल्या महिलांनी आपल्याबरोबर अन्य महिला या व्यवसायात येतील यासाठी सुद्धा जागृती करण्याची अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली आहे.

तर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी, सौ. नीलम राणे यांच्याहस्ते अबोली रिक्षा कर्ज योजनेचे उद्घाटन व्हावे, ही आमची इच्छा होती, आज जिल्ह्यातील महिलांसाठी व्यवसायाचे नवे दालन खुले करतांना आपल्याला आनंद होत असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी काम करण्याचे धोरण आम्ही निश्चित केलय. त्यात महिलांना प्राधान्य राहणार आहे. महिलांना अधिकारवाणीने आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम येत्या जिल्हा बँक करत आहे आणि आगामी काळात करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला, प्रत्येक घराचे आणि व्यक्तीचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी जिल्हा बँक सर्वात एक पाऊल पुढे काम करत  आहे. म्हणूनच दुग्ध व्यवसायात सुद्धा महिलांचा पुढाकार आहे.

आता जिल्हयात सुरू केलेल्या अबोली पिंक रिक्षा योजना माध्यमातून येत्या वर्षात जिल्ह्यात किमान १०० पिंक रिक्षा फिरताना दिसल्या पाहिजेत. जिल्ह्याच्या उज्वल भविष्याची ही महत्वाची नांदी आहे, असेही ते म्हणाले. तर उपाध्यक्ष काळसेकर यांनी जिल्ह्यातील महिला रिक्षा चालविताना पाहिल्याचा क्षण मनाला भावणारा आहे. या रिक्षा चालक महिला जिल्ह्यातील महिलांसाठी आयडॉल ठरतील असा विश्र्वास व्यक्त केलाय. तर माजी आमदार व सिंधुरत्न योजनेचे सदस्य  प्रमोद जठार यांनी सिंधूरत्न विकास योजनेतून महिलांसाठी १०० टक्के अनुदानावर योजना राबविण्याचे आश्वासन दिले.

आजचा दिवस क्रांतिकारी : डॉ देवधर

जिल्ह्यात महिला रिक्षा चालवून एक पाऊल पुढे टाकत आहेत. म्हणून आजचा दिवस जिल्ह्यासाठी क्रांतिकारी आहे. अर्थशास्त्राच्या परिभाषेत महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून पुरुष प्रधान संस्कृतीला उत्तर दिले आहे. घरातील महिलेला आदराने नमस्कार करण्याची संस्कृती आली पाहिजे. तरच महिला बरोबरीला आल्या, असे म्हणता येईल असे ते म्हणाले. 

जिल्हा बँकेचा 'अबोली रिक्षा ' पॅटर्न राज्यासाठी आदर्श

संपूर्ण राज्यात सहकार क्षेत्रात एक से एक योजना राबविणाऱ्या जिल्हा बँकेने खास महिलांसाठी पिंक रिक्षा 'अबोली रिक्षा योजना, सर्वप्रथम सिंधुदूर्ग जिह्यात कार्यान्वित करून पुन्हा एकदा एक वेगळा आदर्श राज्यात निर्माण केला आहे. येत्या १ मे ला देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. आणि अगदी याच पार्श्वभूमीवर पहिल्या पर्यटन जिल्ह्यात अश्व वेगाने घोडदोड करणाऱ्या वाढत्या पर्यटन व्यवसायांच्या दृष्टीने महिलांना आणि विशेषत जिल्ह्यातील महिला युवतींनी या योजनेचं खऱ्या अर्थाने पाठबळ घेल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला रिक्षा व्यवसायाचा एक वेगळा पॅटर्न ठरू शकतो. जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे व अभ्यासू अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि त्यांच्या टीमने खऱ्या अर्थाने महिलांसाठी एक आर्थिक संपन्नतेचे द्वार खुले केले आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.