सोनुर्ली ‘लोटांगण जत्रोत्सव’ 6 नोव्हेंबरला

Edited by: विनायक गांवस
Published on: October 16, 2025 11:58 AM
views 110  views

सावंतवाडी : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली गावच्या श्री देवी सोनूर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. या जत्रोत्सवाची तयारी सुरू झाली असून, देवस्थान समितीच्या पदाधिकारी व गावकर मंडळीनी याबाबत माहिती दिली आहे.

श्री देवी सोनूर्ली माऊलीचा हा वार्षिक उत्सव ‘लोटांगण जत्रोत्सव’ म्हणून विशेषत्वाने ओळखला जातो. हे जागृत देवस्थान नवसाला पावणारे दैवत म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यांतूनच नव्हे, तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक या दिवशी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी सोनूर्ली येथे गर्दी करतात.

अनेक भक्तगण आपल्या मनोकामना आणि नवस पूर्ण झाल्यावर श्री देवी मंदिरात लोटांगण घालतात. ही अनोखी भक्तीची परंपरा या जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. हजारो भाविक लोटांगण घालत आपला नवस फेडतात, ज्यामुळे त्यांच्या श्रद्धेचे आणि देवीवरील विश्वासाचे दर्शन घडते.

दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या (त्रिपुरारी पौर्णिमा) दुसऱ्या दिवशी हा भव्य दिव्य सोहळा पार पडतो. यावर्षी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या जत्रोत्सवात सहभागी होऊन श्री देवी सोनूर्ली माऊलीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

लाखो भक्तांच्या गर्दीने आणि लोटांगणाच्या भक्तीमय वातावरणाने सोनूर्ली गाव या दिवशी भारावून जाणार असून, प्रशासनाने आणि देवस्थान समितीने उत्सवासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था आणि नियोजन योग्य प्रकारे करते.मोठया प्रमाणात होंते व्यापारी वर्ग यांची उलाढाल भाविक याची अफाट गर्दी होत असल्याने दुकाने पणं खुप असतात त्यामुळे मोठया प्रमाणात खरेदी होतें.