
सिंधुदुर्ग : दुधाळ जनावरे खरेदीसाठी कर्ज हवेय? मग बँकेच्या फेऱ्या नकोत की संचालकांच्या भेटीचीही गरज नाही! सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी कर्जप्रक्रिया थेट दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात आणत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या उपक्रमामुळे दुग्धव्यवसायासाठी कर्ज मिळविण्याचा मार्ग अधिक सुलभ होत असून, ‘शेतकऱ्यांच्या दारी बँक’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीला पूरक व्यवसायांची जोड मिळणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाला मर्यादा असताना दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी नियमित उत्पन्नाचा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. मात्र, दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी या व्यवसायाकडे इच्छा असूनही वळू शकत नाहीत. काही शेतकऱ्यांना कर्जप्रक्रियेची माहिती नसते, तर काहींना बँकेपर्यंत पोहोचणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अडचणीचे ठरते.
शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी कर्जप्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर दिला. दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे खरेदी करण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बँकेने पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, कर्जासाठी शेतकऱ्यांनी थेट जिल्हा बँकेच्या शाखेत जाण्याऐवजी संबंधित दूध उत्पादक संघाच्या कार्यालयातच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करता यावी, अशी व्यवस्था करण्यात आली.
कर्ज घ्यायचे असल्यास शेतकऱ्यांना बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करावी लागते. त्यानंतर अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि कर्जप्रक्रियेचा पाठपुरावा करणे अशा अनेक टप्प्यांतून जावे लागते. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा वेळ खर्च होतो. रोजच्या शेतीकामातून वेळ काढून बँकेत जाणेही अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे बँकेने दूध उत्पादक संघाच्या कार्यालयातच बँकेचे अधिकारी उपस्थित राहून शेतकऱ्यांची माहिती घेत आहेत आणि कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेत आहेत.
या पद्धतीमुळे शेतकरी आणि बँक यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत झाली आहे. दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जप्रक्रियेची माहिती मिळणे आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होणेही अधिक सोयीचे ठरत आहे.
सहकार क्षेत्रातील बँकेची भूमिका केवळ ठेवी स्वीकारणे आणि कर्जवाटप करणे एवढ्यापुरती मर्यादित नसते. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी मदत करणे, स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे हीदेखील सहकारी बँकेची महत्त्वाची जबाबदारी असते. आणि हीच जबाबदारी घेत मनीष दळवी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले.
शेतकऱ्यांना बँकेपर्यंत जाण्याऐवजी बँकेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, या विचारातून राबविण्यात येणारा हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देत दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा जिल्हा बँकेचा हा प्रयत्न आगामी काळात अधिकाधिक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.












