'त्या' डाटा एन्ट्री ऑपरेटरचं आमरण उपोषण सुरू

वरिष्ठांच्या आदेशानंतरही कामावर हजर करून घेत नसल्याचा आरोप
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 08, 2026 12:31 PM
views 426  views

सावंतवाडी : वरिष्ठांच्या आदेशानंतरही ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामावर हजर करून घेत नसल्याच्या निषेधार्थ वैभवी प्रशांत साटेलकर यांनी आज जागतिक महिला दिनाच्या दिवशीच सावंतवाडीत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हाभर महिला दिनाचा गाजावाजा करणार प्रशासन गर्भवती महिलेला न्याय देणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

वैभवी साटेलकर यांना ग्रामपंचायत स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामावर हजर करून घेण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यांना कामावर रुजू करून घेतले गेले नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना एका गर्भवती महिलेला न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसावे लागत असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते ? तसेच संबंधित महिलेला न्याय मिळतो का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.