
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा बागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना मदत मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नारनवरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदतीची घोषणा लवकरच करण्यात येईल. बदलत्या हवामानाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे. बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे भविष्यात आंबा बागांचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन होऊन शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.











