
कणकवली : कणकवली येथील एका युवकाच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर १ लाख ६१ हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत साईराज मनोहर मेस्त्री (वय २६, रा. परबवाडी, कणकवली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे इंडसइंड बँक कणकवली शाखेत सेव्हिंग अकाऊंट आहे. फॅब्रिकेशन व्यवसायासाठी त्यांनी AYE फायनान्स लिमिटेड, कुडाळ शाखेतून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ३० जानेवारी रोजी त्यांचे कर्ज मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात १ लाख ९० हजार ९०२ रुपये जमा झाले. त्या दिवशी त्यांनी मित्राला ऑनलाईन ८ हजार रुपये पाठवले. त्यानंतर खात्यातून १,७२४ रुपये कमी झाल्याचा मेसेज आला होता. पुढील दिवशी त्यांनी दुसऱ्या मित्राला २० हजार रुपये ऑनलाईन पाठवले. मात्र १ फेब्रुवारी रोजी मोबाईलवरील मेसेज तपासताना त्यांच्या खात्यातून ३१ जानेवारी रोजी रात्री १०.१७ वाजता १ लाख ६१ हजार रुपये परस्पर कमी झाल्याचे आढळून आले.
या रकमेबाबत त्यांनी कोणालाही ओटीपी किंवा बँक तपशील दिले नसतानाही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी इंडसइंड बँकेत ऑनलाईन तक्रार केली तसेच ५ फेब्रुवारी रोजी कणकवली शाखेत जाऊन बँक व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दिली. या प्रकारामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगत साईराज मेस्त्री यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.











