
कुडाळ : "२०१४ ते २०२४ या काळात आम्ही सिंधुदुर्गात मायनिंगचा एकही नवीन प्रकल्प सुरू होऊ दिला नाही. मात्र, २०२४ मध्ये जिल्ह्यातील सत्ता एकाच घरात गेल्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अवैध उत्खनन सुरू झाले असून, तब्बल ११ मायनिंग प्रकल्प आणि देवगड मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे," अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख व माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
आजगाव-धाकोरा परिसरातील 'जेएसडब्ल्यू' मायनिंग प्रकल्पाचे सर्वेक्षण रोखणाऱ्या ५० ग्रामस्थांवर शासनाने अपहरणाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईचा निषेध करत नाईक म्हणाले की, "मायनिंग सर्वेक्षणासाठी आलेल्या कंपनीच्या लोकांकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र होते. वास्तविक पाहता या अधिकाऱ्यांचा मायनिंगशी काहीही संबंध नसतो. यावरून जिल्हा प्रशासन आणि सत्ताधारी मिळून या अवैध प्रकल्पांना पाठींबा देत असल्याचे स्पष्ट होते. सत्ताधाऱ्यांच्या दबावाशिवाय पोलिसांकडून ग्रामस्थांवर अशी खोटी कारवाई होऊच शकत नाही."
"पूर्वी कळणे येथे झालेल्या मायनिंग उत्खननामुळे अतिवृष्टीत डोंगर खचून लोकांची घरे, शेती आणि बागायतींचे प्रचंड नुकसान झाले होते. हाच धोका आता संपूर्ण जिल्ह्याला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासियांनी आपल्या जमिनी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी या घातक प्रकल्पांना ठामपणे विरोध करावा, शिवसेना पूर्ण ताकदीने ग्रामस्थांच्या पाठीशी उभी राहील," असे आवाहनही वैभव नाईक यांनी केले आहे.











