LIVE UPDATES

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात

एक जण गंभीर तर महिला बालंबाल बचावली
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 18:58 PM
views 71  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर आज अपघातांची मालिका पाहायला मिळाली. महामार्गावरील अनाव हुमरमळावाडी आणि राणे दुकान स्टॉप अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातांमध्ये एका ठिकाणी दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे, तर दुसऱ्या अपघातात कार पलटी होऊनही महिला चालक सुदैवाने बालंबाल बचावली आहे.

अनाव हुमरमळावाडी येथे दुचाकी, मारुती ओम्नी आणि अल्ट्रॉझ कार यांच्यात जोरदार धडक होऊन तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच दुचाकीवरून तीन युवक चालले होते. महामार्गावर समोरच हायवे पोलिसांची गाडी उभी असल्याचे पाहून पकडले जाण्याच्या भीतीने दुचाकीस्वराने अचानक गाडी वळवण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वराच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नियंत्रण सुटून दुचाकी, ओम्नी आणि अल्ट्रॉझ कार एकमेकांना धडकल्या. या धडकेत मारुती ओम्नी थेट दुचाकीवरच पलटी झाली, ज्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील दुसरा अपघात राणे दुकान स्टॉपजवळ झाला. कसालहून कुडाळच्या दिशेने जाणारी एक कार चालवताना महिला चालक मोबाईल फोनवर बोलत असल्याची माहिती समोर आली आहे.

फोनवर बोलत असताना महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरवर चढली. वेग जास्त असल्याने कारचे टायर फुटले आणि कार चक्क पलटी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, कुडाळच्या दिशेने जाणारी कार थेट मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन उलटली.

 अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत कारमधील महिलेला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या भीषण अपघातात महिलेला केवळ किरकोळ दुखापत झाली असून ती बालंबाल बचावली आहे.

दोन्ही अपघातांची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही ठिकाणी वाहने बाजूला करून वाहतूक कोंडी फोडण्यात आली, पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.

महामार्गावर प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळणे आणि मोबाईलचा वापर टाळणे किती गरजेचे आहे, हेच या अपघातांवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.