
दोडामार्ग : तिराळी येथील पूच्छ कालव्याजवळ पर्यटनासाठी आलेल्या गोव्यातील चार पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाश्या थेट कारमध्ये घुसल्यामुळे पर्यटकांना आपली कार जागीच सोडून जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातील चार पर्यटक तिराळी परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. पूच्छ कालव्यानजीक फोटो काढत असताना अचानक मधमाश्यांच्या थव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. स्वतःचा बचाव करण्यासाठी पर्यटक कारमध्ये जाऊन बसले. मात्र संतापलेल्या मधमाश्या कारच्या आतही घुसल्या. अखेर कोणताही पर्याय न उरल्याने पर्यटकांना कार तिथेच सोडून बाहेर पळावे लागले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य सुहास देसाई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पीडित पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि त्यांना आवश्यक ती प्राथमिक मदत मिळवून दिली. त्यांच्या या समयसूचकतेमुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तिराळी परिसरात काही वेळ चिंतेचे आणि भीतीचे वातावरण होते. सुदैवाने, वेळेत मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.












