जगातील सगळ्यात मोठं धार्मिक संमेलन सुरू झालाय. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 45 दिवस प्रयागराज येथे सुमारे 40 कोटी भक्त येणार आहेत, हा योग 144 वर्षांनी येतो आणि त्याला म्हणतात "महा "कुंभमेळा. कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.
दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.
सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते.
समुद्रमंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून चार थेंब पृथ्वीवर ,चार थेंब स्वर्गात व चार थेंब नरकात पडले.
पृथ्वीवर अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी पडले म्हणून तिथे (अमृत)कुंभमेळा साजरा केला जातो. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो.
शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शाही स्नान म्हणजे एकाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्र स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला जातो. त्याची विशेष शोभायात्रा निघते. त्यांचे स्नान झाल्यावर नंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात अशी प्रथा प्रचलित आहे.
कुंभमेळ्याला 'जागतिक सांस्कृतिक वारसा'
कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव / सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही, असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला 'जागतिक सांस्कृतिक वारसा' म्हणून घोषित केले आहे.
कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो.या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती, त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम-हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पहायला मिळतात.
आखाडा संकल्पना
कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात. काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात.
१३ आखाडे महत्त्वाचे आहेत
1. जुना आखाडा
2. निरंजनी आखाडा
3. महानिर्वाणी आखाडा
4. अटल आखाडा
5. आहवान आखाडा
6. निर्मोही आखाडा
7. आनंद आखाडा
8. पंचाग्नी आखाडा
9. नागपंथी गोरखनाथ आखाडा
10. वैष्णव आखाडा
11. उदासीन पंचायती बडा आखाडा
12. उदासीन नया आखाडा
13. निर्मल पंचायती आखाडा
मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले असे मानले जाते. सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचे नियम, आचरण असते. कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते, त्यांना सेवा - सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
सिंहस्थ कुंभमेळा हा कुंभमेळ्याचा अजून एक प्रकार आहे. हा त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे दर बारा वर्षांनी घडणारा, हिंदू धर्मीयांचा मेळा आहे. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. अशाच प्रकारचे कुंभमेळे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन येथेही भरतात.
लेखक
डॉ. विजय आठल्ये