
कुडाळ :मुंबई - गोवा महामार्गावर, झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना यात यश आले नाही. एटीएममधील सुमारे साडेआठ लाख रुपये सुरक्षित असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी (आज) रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. एटीएम केंद्रावर सुरक्षेसाठी कोणीही कर्मचारी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी एटीएमच्या तिजोरीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली अडकुरी, पोलीस निरीक्षक प्रवीण धडे, पिंगुळी बीट अंमलदार ममता जाधव, सुबोध मळगावकर, समीर बांदेकर, सुप्रिया भागवत, निकम, आणि अमोल बंडगर यांच्यासह पोलीस ताफा तात्काळ घटनास्थळी पोहोचला.
पोलिसांसोबत श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. एटीएमच्या बाहेर चोरट्यांनी एटीएम कापण्यासाठी वापरलेले कटर आणि इतर साहित्य पोलिसांना आढळून आले. बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.