
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसवरील हिरवळीत वसलेल्या हरित-तंत्रज्ञान सभागृहात १५ सप्टेंबर २०२५ हा दिवस कोकणच्या ग्रामीण शिक्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय या प्रतिष्ठेत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला याचे नाव जाहीर होताच सभागृहात उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट झाला. कोकणाच्या किना-यावर वसलेल्या या महाविद्यालयाचे नाव एकाएकी मुंबई विद्यापीठाच्या संपूर्ण सभागृहाला दुमदुमून गेले. हा केवळ एक पुरस्कार नव्हता, तर कोकणातील सामान्य मच्छीमार, शेतकरी, कामगार यांच्या मुलांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रयत्नांचा समाजमान्य सन्मान होता.
त्याक्षणी मंचावर संसदीय कार्य व अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, पेट्रोन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांच्या डोळ्यांमध्ये अभिमानाची चमक होती.कार्यक्रमाच्या औचित्याने व्यासपीठावर केंद्रीय सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. रवींद्र कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय भामरे, तसेच कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.
या महाविद्यालयाचा इतिहास केवळ एका इमारतीचा किंवा काही अभ्यासक्रमांचा नाही. तो समाजपरिवर्तनाचा इतिहास आहे. १९४५ साली प्रिं.एम.आर. देसाई आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी स्थापन केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाने "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हा ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारून वंचितांना शिक्षण देण्याचा निर्धार केला. त्या काळात शिक्षण ही चैनीची वस्तू समजली जात होती. गरीब, शेतकरी, मजूर यांच्या मुलांना शिकण्याची संधीच नव्हती. पण ह्या विचारवंतांनी ज्ञान हीच खरी शक्ती आहे हे ओळखून शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि कागल विद्यालय सुरू केले.त्या शाळेतून प्रारंभ झालेली ज्ञानयात्रा पुढे कोल्हापूरात गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय उभारण्यात पोहोचली. त्याचबरोबर मुरगुड, पेठवडगाव, कागल, सेनापती कापशी येथे शाखा सुरू झाल्या. मंडळाच्या ज्ञानतपस्वी यांनी तेव्हा ठरवलं की ज्ञान केवळ शहरी मर्यादांमध्ये अडकून राहता कामा नये. ते खेडोपाडी, डोंगरकप्पारी, समुद्रकिनारी पोहोचले पाहिजे. हाच विचार घेऊन १९६१ मध्ये वेंगुर्ल्यात शिक्षण प्रसारक मंडळाने पाय रोवला.वेंगुर्ला किनाऱ्यावरील हे बंदरशहर त्या काळात शैक्षणिक दृष्ट्या उपेक्षित होते. विद्यार्थी दहावीपर्यंत शिकायचे, त्यानंतर त्यांना कोल्हापूर किंवा बाहेरचा रस्ता धरावा लागे. शेतकरी, मासेमार कुटुंबांच्या मुलांना हे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत शिक्षण प्रसारक मंडळाने "वेंगुर्ला महाविद्यालय" सुरू केले. पालकांची साथ मिळाली. समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पण संघर्ष प्रचंड होता. पैसा कमी, साधने अपुरी; पण संस्थापकांची जिद्द अफाट होती. या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते खासदार, उत्कृष्ट संसदपटू बॅ. बाळासाहेब खर्डेकर. त्यांचे इंग्रजी विषयातील ज्ञान आणि अभ्यासक वृत्तीने महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल स्थिरावली. त्यांच्या निधनानंतर १९६५ मध्ये महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आणि ते आजतागायत कोकणाच्या शैक्षणिक नकाशावरील तेजस्वी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचार्य, संस्कृत पंडित तसेच आमदार म्हणून बहुआयामी कार्य करणाऱ्या प्रा. एम. आर. देसाई यांनी आपल्या सखोल ज्ञान, प्रगल्भ दृष्टीकोन आणि कुशल प्रशासनाच्या बळावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याचा आलेख सातत्याने उंचावत नेला. त्यांच्या नेतृत्वामुळे मंडळाने केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही नवनवीन उपक्रम राबवत व्यापक जनमानसात विश्वास आणि आदर संपादन केला.
प्रारंभी महाविद्यालयात कला व वाणिज्य हेच विभाग होते. हुशार, होतकरू मुलांना विज्ञान शिकायचे असेल तर त्यांना सावंतवाडी किंवा कोल्हापूर गाठावे लागायचे. पालकांची यातून मोठी गैरसोय होत होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी १९९२-९३ मध्ये विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. पण प्रयोगशाळा, उपकरणांसाठी आवश्यक निधीचा प्रश्न उभा राहिला. इथे पुढे आले बीकेसी असोसिएशनचे समाजप्रेमी, आंबा बागायतदार, सारस्वत बँक आणि स्थानिक उद्योजक. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रयोगशाळा उभारत आली. तत्कालीन खासदार एकनाथ ठाकूर यांनी २५ लाख रुपये खासदार निधीतून दिले आणि विज्ञान विभागाची भक्कम पायाभरणी झाली.आज विज्ञान विभाग हा महाविद्यालयाचा कणा आहे. येथून अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, संशोधक म्हणून घडले आहेत.महाविद्यालयाच्या शैक्षणिक सुविधा वर्षाकाठी सुधारणाऱ्या राहिल्या.आज सुसज्ज ग्रंथालय, संगणक केंद्र, भौतिक-रसायन-वनस्पतीशास्त्र प्रयोगशाळा, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वसतिगृह, खेळांसाठी जिमखाना अशा सर्व सुविधा आहेत.
महाविद्यालयाने सामाजिक कार्यालाही प्राधान्य दिले. "ग्रीन नेचर क्लब" या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वेंगुर्ला किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली आहे. प्लास्टिक मुक्ती मोहिमा, वृक्षारोपण, खारफुटी संवर्धन, जलसंवर्धन मोहिमा, पाणथळ जमिनीबद्दल जनजागृती या सर्व मोहिमा सतत होत राहतात. वेंगुर्ला नगरपालिकेला स्वच्छता पुरस्कार प्राप्त होण्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे योगदान मोठे आहे.
एन.एस.एस. (राष्ट्रीय सेवा योजना) व एन.सी.सी. (राष्ट्रीय छात्र सेना) या दोन विभागांनी महाविद्यालयाची ओळख अधिक दृढ केली आहे. एन.एस.एस. स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत अभियान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, ग्रामसभांमधील जनजागृती उपक्रम घेतले आहेत. त्यांनी गावोगावी "स्वच्छ गाव, निरोगी गाव" असा संदेश पोहोचवला. एन.सी.सी. कॅडेट्सना शिस्त, धैर्य, राष्ट्रभक्ती यांचे मोलाचे शिक्षण मिळते. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय शिबिरांमध्ये सहभागी होतात. काही विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभाग नोंदवला आहे. अनेक माजी विद्यार्थी आज भारतीय सैन्य, हवाई दल व नौदलात कार्यरत आहेत.
"क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच आपला ठसा उमटवला आहे.अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर सातत्याने उत्तुंग कामगिरी करून स्वतंत्र ओळख निर्माण केली. वैयक्तिक तसेच सांघिक अशा दोन्ही प्रकारच्या खेळांमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी कौशल्य, जिद्द आणि शिस्त यांचे अनोखे दर्शन घडवले. या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार यश संपादन केले असून त्यांच्या कर्तृत्वामुळे महाविद्यालयाचा झेंडा देशभर उंचावला आहे. आजही त्यांपैकी अनेकजण सैन्यदल, पोलिस सेवा, क्रीडा प्राधिकरण तसेच विविध शासकीय व खासगी क्षेत्रांतील उच्च पदांवर कार्यरत राहून समाजाची सेवा करत आहेत. या यशकथांनी केवळ महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले नाही, तर ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी मार्ग निर्माण केला आहे."
महाविद्यालयाने स्वावलंबन व ग्रामविकासासाठी पर्यटन, ग्रामीण भागातील गुणवत्ता शिक्षण, पाणथळ प्रदेश पुनर्संचय, जागतिक बदलांचा मानव जीवनावर परिणाम, निसर्ग संवर्धनातील महिलांचे योगदान अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा घेतल्या. या परिषदांतून ग्रामीण विद्यार्थ्यांना संशोधनाचे व चर्चेचे व्यासपीठ मिळाले. महाविद्यालयाची सांस्कृतिक परंपराही समृद्ध आहे. दरवर्षी आयोजित केली जाणारी "बॅ. बाळासाहेब खर्डेकर स्मृती इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा" ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक भाषेत आत्मविश्वासाने विचार मांडायला शिकवते. केवळ विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी शरीर सौष्ठव स्पर्धा हे एक अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे.माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेली प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा कोकणातील नाट्यप्रेमींसाठी व्यासपीठ ठरली आहे. "कलावलय" सारख्या नाट्यसंस्था या पायातून उभ्या राहिल्या आहेत.
महाविद्यालयाने समाजाभिमुख उपक्रम कौशल्याधारित अभ्यासक्रमांनी बळकट केले आहेत. "इको-टुरिझम" अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगारक्षमतेची संधी देतो. "स्वामिनी बचत गटां" साठी यूएनडीपी सहकार्याने इंग्रजी संभाषण अभ्यासक्रम राबवला गेला. २०१२ मध्ये स्थापन झालेली प्रिं.एम. आर. देसाई इंग्रजी माध्यम शाळा नव्या पिढीस जागतिक दर्जाचे शिक्षण देत आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद मध्येही महाविद्यालयाची प्रगतीही लक्षणीय आहे. प्रथम मूल्यांकनाला 'सी प्लस' , दुसऱ्याला 'बी ग्रेड', तिसऱ्याला 'ए ग्रेड' (सीजीपीए ३.२३) मिळाले. ग्रामीण भागातील संस्थेसाठी ही झेप अद्भुत आहे.
विद्यमान प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी आधुनिक दृष्टिकोन घेऊन कार्यरत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रोन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, संस्था प्रतिनिधि सुरेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य प्रो.डी. बी. गोस्वामी यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालय प्रगतीच्या प्रवासावर आहे.
"बहुजन हिताय, बहुजन सुखाय" या ब्रीदवाक्याचा वारसा जपत सात दशकांत कोकणातील सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचा प्रकाश देणारे बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय आज मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित झाले आहे. हा पुरस्कार एका संस्थेला दिलेला नाही, तो आहे कोकणातील प्रत्येक शेतकरी, मच्छीमार व कामगार पालकांच्या स्वप्नांचा सन्मान.आज वेंगुर्ल्यातून पेटलेला हा ज्ञानदीप कोकणाच्या गाभा-यातून महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाशमान होत आहे. हे महाविद्यालय केवळ शैक्षणिक केंद्र नाही, हा सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि राष्ट्रीय मूल्यांचा दिपस्तंभ आहे. "सर्वांसाठी शिक्षण, सर्वांसाठी प्रगती" या तत्वाचे हे सजीव उदाहरण आहे.