भारतरत्न स्थापत्य अभियंता डॉ. विश्वेश्वरय्या !

Edited by:
Published on: September 14, 2025 20:12 PM
views 20  views

डॉ. दिनेश नागवेकर

(M.Tech (civil & Arch) PhD, M.B.A. (Real Estate) D. Tech-Architecture (California)

(लेखक इंस्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स, इंस्टिट्युशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स, कौन्सील ऑफ इंजिनिअर्स अशा अभियांत्रिकांच्या वीस संस्थांचे आजीवन सदस्य आहेत.)


इंजिनिअर्स हे शास्त्रज्ञ व त्यांच्या शोधाचा उपयोग यामधील महत्त्वाचा दुवा आहेत. आजचा जीवन मानाचा दर्जा जो उंचावलेला दिसत आहे. त्याचे बरेचसे श्रेय इंजिनिअर्स व तंत्रज्ञ यांना आहे. कोणताही शोध किंवा सुधारणेचा विचार शास्त्रज्ञांनी केला की इंजिनिअर्स त्यांचे रुपांतर उत्पादनात करतात. त्यांचा फायदा समाजाला होत आहे.

म्हणूनच अभियंत्याचे ऋण समाजाने व्यक्त करण्यासाठी महान अभियंता डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिनी भारतात १९६८ पासून अभियंता दिन साजरा केला जातो. यावर्षी १५ सप्टेंबरला ५८ वा अभियंता दिन देशभरात साजरा केला जाणार आहे. सद्या भारतात दहा हजारपेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेज असून दरवर्षी १५ लाख इंजिनिअर्स निर्माण होतात. सर्वाधिक महाराष्ट्रात १५०० इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदविका व पदवीधारक अभियंत्यांना नोकरी न सोडता आपली शैक्षणिक पात्रता वाढविण्याची संधी उपलब्ध झाल्या आहेत. यावर्षी जागतिक अभियंता दिनानिमित्त युनेस्कोने ४ मार्च रोजी 'निरंतर विकासाच्या उद्देशांमध्ये पुढे जाण्यासाठी अभियंत्याच्या शक्तीचा उपयोग करणे' हा विषय निवडला आहे तर भारतातील इन्स्टिट्युट ऑफ इजिनिअर्स ही संस्था Deep Tech & Engineering Excellence: Driving India's Techade ही थीम घेवून अभियंता दिवस साजरा करणार आहे.

अभियंते सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी विश्लेषण डिझाईन, शोध, कोडिंग, बांधणी आणि निर्मिती करण्यासाठी वैज्ञानिक तत्वे लागू करतात. त्याच्या सर्वात महत्त्वाच्या साधनांपैकी एक म्हणजे त्याची स्वतःची सर्जनशीलता.

भारतरत्न स्थापत्य अभियंता डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ मध्ये कर्नाटकची राजधानी बंगळूर शहराच्या ईशान्य दिशेत सुमारे आठ किमी. अंतरावर कोलार जिल्ह्यातील चिकबलापूर तालुक्यात मुद्देनहळ्ळी या गावी एका गरीब कुटूंबात झाला. दरवर्षी श्री. विश्वेश्वरय्या यांच्या १५ सप्टेंबर या जन्मदिनी भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. सर विश्वेश्वरय्या यांचे ज्ञान व व्यक्तिमत्व जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये परिपूर्ण होते. स्थापत्य शास्त्रात त्यांचे ज्ञान तर सर्वोच्च होतेच, त्याचबरोबर इतर क्षेत्रातील ज्ञान सुद्धा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना आश्चर्यचकीत करणारे होते. त्यांच्यामध्ये कल्पकता होती. चतुरस्त्रपणा, बहुआयामी व द्रष्टेपणा इत्यादी गुण होते.

सर विश्वेश्वरय्या १८८० मध्ये बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे येथील कॉलेज ऑफ सायन्समध्ये (सदयाचे पुणे इंजिनिअरींग कॉलेज) १८८१ मध्ये प्रवेश घेवून १८८३ मध्ये एल्.सी.ई. ही पदवी प्राप्त करुन विद्यापिठात पहिले आले.

पदवी प्राप्त होताना श्री विश्वेश्वरय्या हे मुंबई शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात सिंचन विभागात १८८४ मध्ये नाशिक येथे सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले. त्यावेळी ते २३ वर्षांचे होते. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना १९०३ साली अधिक्षक अभियंता म्हणून बढती मिळाली. या पदावर काम करताना त्यांच्या असे लक्षात आले की, सेवाज्येष्ठता, योग्यता असूनही त्यांना मुख्य अभियंता हे सर्वोच्च पद त्यांना मिळणार नाही कारण हे पद ब्रिटीश सरकारने फक्त ब्रिटीश व्यक्तीसाठी राखीव ठेवले होते. त्यामुळे त्यांनी १९०७ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरीच्या काळात त्यांनी धुळे पाणी पुरवठा, सक्कर पाणी पुरवठा, खडकवासला धरणावरील स्वयंचलित दरवाजे, एडन छावणी पाणी पुरवठा अशा अनेक योजना चांगल्याप्रकारे राबविल्या.

निवृत्तीनंतर हैदराबाद येथील मुसा नदीला आलेल्या पुरामुळे श्री विश्वेश्वरय्या यांची हैदराबादला विशेष सल्लागार अभियंता म्हणून नेमणूक झाली. हे काम पूर्ण करुन १५ नोव्हें १९०९ रोजी म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता म्हणून रुजू झाले. मुख्य अभियंता म्हणून काम करताना त्यांनी कृष्ण राजसागर धरणाची योजना तसेच म्हैसूर राज्यात रेल्वेची व्यवस्था निर्माण करण्याची योजना तयार केली. त्यानंतर तीनच वर्षात नोव्हें. १९१२ मध्ये म्हैसूरचे दिवाण म्हणजे मुख्यप्रधान म्हणून त्यांची नेमणूक म्हैसूरचे महाराज श्रीकृष्णराज वाडियार यांनी केली. त्यांची दिवाणपदावर नेमणूक झाल्यावर विविध क्षेत्रामध्ये म्हैसूरची सर्वांगीण प्रगती देशातील इतर प्रदेशाच्या तुलनेने अत्यंत वेगाने सुरुवात झाली. त्यांच्या कारकिर्दीत, बँक ऑफ म्हैसूर, बंगळूर इंजिनिअरींग कॉलेज, म्हैसूर विद्यापीठ, भद्रावती येथे पोलाद कारखाना, शरावती नदीवरील विज निर्मिती प्रकल्प अशा अनेक योजना कार्यान्वित झाल्या.

म्हैसूरच्या महाराजांशी काही मुद्यावर पटले नाही. म्हणून सन १९१९ मध्ये त्यांनी दिवाण पदावरुन निवृत्ती स्विकारली. अवघ्या सात वर्षांच्या काळात अनेक कल्याणकारी योजना राबवून म्हैसूरच्या इतिहासात त्यांनी आपले नाव अजरामर करुन ठेवले आहे. विश्वेश्वरय्या यांनी आयुष्यात इतर काहीही केले नसते आणि फक्त एक कृष्णराज सागर हे धरण बांधले असते. तरी सुद्धा ते अमर झाले असते असेही महात्मा गांधी यांनी म्हटले होते. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे त्याचे उत्पन्न वाढावे, आर्थिक प्रगती व्हावी, सर्वसामान्य माणसाचे कल्याण व्हावे, यांचा विचार करुन विश्वेश्वरय्या यांनी धोरणे आखली.

म्हैसूरच्या राज्याच्या प्रशासनाच्या सर्वोच्च पदावर दिवाण म्हणून त्यांची नेमणूक झाल्यावर दिवाण पदावर रुजू होण्यापूर्वी त्यांनी आपले सर्व नातेवाईक व जवळचे मित्र यांना आमंत्रित करुन एक समारंभ आयोजित केला आणि भोजनानंतर सर्वांना सांगितले की, मी दिवाण म्हणून कामावर रुजू झाल्यावर कोणीही माझ्याकडे एखादी मेहेरबानी करुन घेणेसाठी येऊ नये. १९२३ साली म्हैसूर आर्यन अॅण्ड स्टील कंपनीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९३० साली ते या पदावरुन निवृत्त झाले. परंतु साडेसहा वर्षात त्यांनी पगार घेतला नाही. सर विश्वेश्वरय्या यांनी शिक्षण, उद्योग व्यवसाय, पाणी पुरवठा व सिंचन, आरोग्य, शेती अनेक विषयावर कार्य केले, भाष्य केले, सल्लामसलत केली आहे. त्यांचे हजारो अहवाल लेख प्रसिद्ध आहेत. सर विश्वेश्वरय्या यांनी २८ पुस्तके विविध विषयावर लिहिली. त्यांनी लिहिलेली पुस्तकेही देशाच्या प्रगतीसाठी होती. त्यांनी विचार मांडले ते प्रगत आणि समर्थ राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या लिखाणातून राष्ट्र प्रेम जाणवत रहाते. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी फार मोठी उंची गाठली होती.

त्यांनी भारतातील अभियंत्याविषयी म्हटले आहे. सर्वसाधारण भारतीय इंजिनिअर्समध्ये परदेशच्या इंजिनिअर्सच्या मानाने बौद्धिक क्षमता किंवा उत्साह यांत कमी आहेत असे नाही. त्यांच्याकडे इंजिनिअरींग कौशल्य तर पाश्चात्य देशापेक्षाही अधिक आढळले. आज भारतात अभियंत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, नगरपालिका, कारखाने, औद्योगिक क्षेत्र इत्यादी अनेक ठिकाणी महत्त्वाची कामे करीत आहेत. परंतू असे आढळून येते की ते जेथे कार्यरत आहेत. त्या संस्थाच्या व्यवस्थापनामध्ये ध्येय धोरण ठरविण्याऱ्या वरिष्ठ समितीमध्ये त्यांना स्थान नाही. त्यामुळे हे अभियंते स्वयंप्रेरणा नसणारे पुढाकार न घेणारे फक्त सांगकामे बनले आहेत. हे एक प्रकारचे त्यांचे खच्चीकरण आहे एवढेच नव्हे तर राष्ट्राची मोठी बुद्धिमत्ता, एक प्रकारे वाया जात आहे. वास्तविक व्यवस्थापनाचा निर्णय राबविण्याची अंतिम जबाबदारी अभियंत्यावर असल्यामुळे त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामिल केले पाहिजे. त्यामुळे अंतिम उद्दिष्ट्य साध्य करण्यास प्रशासनाला मदत होणार आहे. इंजिनिअर्स हे शास्त्रज्ञ व त्यांच्या शोधाचा उपयोग यामधील महत्त्वाचा दुवा आहेत. आजचा जीवन मानाचा दर्जा जो उंचावलेला दिसत आहे. त्याचे बरेचसे श्रेय इंजिनिअर्स व तंत्रज्ञ यांना आहे. कोणताही शोध किंवा सुधारणेचा विचार शास्त्रज्ञांनी केला की इंजिनिअर्स त्यांचे रुपांतर उत्पादनात करतात. त्यांचा फायदा समाजाला होत आहे.

म्हणूनच अभियंत्याचे ऋण समाजाने व्यक्त करण्यासाठी महान अभियंता डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिनी भारतात १९६८ पासून अभियंता दिन साजरा केला जातो. यावर्षी १५ सप्टेंबरला ५६ वा अभियंता दिन देशभरात साजरा केला जाणार आहे. डॉ. विश्वेश्वरच्या यांना अनेक मान सन्मान मिळाले. मुंबई औद्योगिक समिती, भारतीय अर्थ विषयक समिती, अखिल भारतीय उत्पादक संघ, भद्रावती तसेच जमशेदपूर पोलाद कारखाना या सारख्या अनेक ठिकाणी ते अध्यक्ष होते. मुंबई, कलकत्ता, अलहाबाद, काशी, जोधपूर, आंध्र, म्हैसूर व पाटणा या विद्यापिठांनी डॉक्टरेट ह्या सन्मान्य पदव्या अर्पण केल्या. भारतातील व जगातील काही इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स संस्थांनी मानद सदस्यत्व अर्पण केले.

विश्वेश्वरय्या यांच्या नावाने अभियांत्रिकी कॉलेज, विश्व विद्यालय अशा आठ संख्या भारतात सुरु आहेत. विश्वेश्वर यांचे महानत्व हे सर्व स्वकतृत्वानेच मिळविले आहे. ते दिवसातून १८ ते २० तास काम करायचे. सतत कष्ट, प्रामाणिकपणा, उच्च प्रगल्भता, नम्रपणा, निगर्वी स्वभाव, परोपकारी वृत्ती, समन्वयवादीपणा इत्यादी अनेक गुणांनी त्यांनी मोठेपणा स्वकर्तृत्वाने मिळविला.

७ सप्टेंबर १९५५ रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे हस्ते 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्यात आला. एका इंजिनिअरर्सला हा सन्मान मिळाला. १५ सप्टें १९६० रोजी भारताच्या डाकतार विभागाने त्यांच्या सन्मानार्थ खास डाक तिकिट प्रस्तुत केले. १५ सप्टें १९६१ रोजी पं. जवाहरलाल नेहरु यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्मशताब्दी समारोह साजरा करण्यात आला. त्यांच्या जन्मशताब्दी समारोहानंतर थोड्याच दिवसात १४ एप्रिल १९६२ मध्ये हे व्यक्तिमत्व अनंतामध्ये विलिन झाले. त्यावेळी त्यांचे वय होते. १०० वर्ष ७ महिने ३ दिवस, त्यांना दिर्घायुष्य लाभले.

केवळ अभियंते नाही तर सर्व सामान्यांही प्रेरणा मिळेल असे अफार कार्य डॉ. विश्वेश्वरय्या यांनी केले आहे. या महान अभियंत्याला विनम्र अभिवादन आणि भारतातील सर्व अभियंत्याना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !