
सावंतवाडी : गेल्या काही महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे अनेक तरुणांचे जीवन धोक्यात आले आहे. गांजा, चरस यांसारख्या अंमली पदार्थांसोबतच एमडीएमए, एक्स्टसी आणि इतर आधुनिक ड्रग्सची उपलब्धता वाढल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन सिंधुदुर्गने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या समस्येवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांत शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्यामुळे अनेक विद्यार्थी आणि तरुण व्यसनाधीन होत आहेत. आयएमएने दिलेल्या माहितीनुसार, या व्यसनांमुळे अनेक युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेल्या आत्महत्यांमागे अंमली पदार्थांचे सेवन हे एक महत्त्वाचे कारण असल्याचेही निदर्शनास आले आहे. अंमली पदार्थांच्या वाढत्या सेवनासाठी केवळ उपलब्धताच नव्हे, तर समाजातील प्रबोधनाचा अभाव हे देखील एक मोठे कारण आहे. या व्यसनांचे दुष्परिणाम, कायदेशीर गुन्हे आणि जीवनावर होणारे वाईट परिणाम याबाबत जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ लक्ष घालून कठोर पावले उचलण्याची विनंती आयएमएने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
आयएमएच्या मते, अंमली पदार्थांचा पुरवठा पूर्णपणे थांबवणे आणि व्यसनाधीन तरुणांसाठी योग्य उपचार व पुनर्वसन केंद्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने यात सहभाग घेतल्यास युवावर्गाचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आय एम ए या ॲलोपथी डॉक्टर्सच्या संघटनेने जिल्हाधिकारी यांना हे निवेदन सादर केले. यावेळी
सावंतवाडी येथील डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. अमुल पावसकर, डॉ. कादंबरी पावसकर,डॉ. शंतनु तेंडुलकर, डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ. नवांगुळ, डॉ. खटावकर, डॉ. कश्यप देशपांडे तसेच कुडाळ येथील डॉ. निगुडकर, डॉ आकेरकर, डॉ सुधीर रेडकर, डॉ पाटणकर, डॉ संजय केसरे, डॉ गुरूराज कुलकर्णी, डॉ मकरंद परूळेकर, डॉ सौ परूळेकर तसेच मालवण येथील डॉ विवेक रेडकर, डॉ लिमये, डॉ सौ लिमये, डॉ सोमवंशी, डॉ व सौ झांटये, डॉ हरीश परूळेकर, डॉ राहुल वझे कणकवली येथील डॉ आंबेरकर, डॉ विद्याधर तायशेटे, डॉ रेवडेकर, डॉ शेळके, डॉ संदीप सावंत, डॉ रासम असे ५५ डॉक्टर्स उपस्थित होते.