LIVE UPDATES

Dodamarg news : झरेबांबर-सावंतवाडी एसटी बस रस्त्यात पडली बंद

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 07, 2026 12:32 PM
views 51  views

दोडामार्ग : सावंतवाडी डेपोची झरेबांबर-सावंतवाडी ही एसटी बस सोमवारी सकाळी मोरगाव येथे अचानक बंद पडली. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. बस बंद पडण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही, मात्र तांत्रिक बिघाड किंवा देखभाल- दुरुस्तीतील त्रुटीमुळे ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकारावर बाबुराव धुरी म्हणाले, दोडामार्ग तालुक्याच्या वाट्याला नेहमीच जुन्या जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या बसेस पाठवून येथील प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. दोडामार्ग तालुक्यावर आत्तापासून नाही तर कायमच अन्याय होत आला आहे. आम्हाला नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. आता ह्या जुन्या जीर्ण गाड्या पाठवून थट्टा करण्याचा प्रकार थांबवावा. तात्काळ नवीन बसेस द्याव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा बाबुराव दत्ताराम धुरी, यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले, दोडामार्ग तालुका दुर्गम, डोंगराळ भागात असूनही येथे कधीच नवीन गाड्या दिल्या जात नाहीत. येथील रुग्ण, विद्यार्थी, नोकरदार यांना याचा रोज त्रास सहन करावा लागतो. वेळेवर बस येत नाही, आलीच तर वाटेत बंद पडते. पावसाळ्यात तर या जुन्या जीर्ण गाड्यांचे ब्रेक लागत नाहीत, वायपर चालत नाहीत, त्यामुळे अपघाताचा धोका मोठा आहे.