
महाड : रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीचे मानाचे 'जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार' नुकतेच घोषित करण्यात आले. यामध्ये महाड तालुक्यातील आंबवली येथील सुपुत्र तसेच सध्या रा.जि.प. उच्च प्राथमिक शाळा कांबळे तर्फे महाड येथे सेवारत असणारे उपक्रमशील शिक्षक संजय महादेव कोंडविलकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संजय कोंडविलकर यांनी गेल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षण विस्तारासाठी आणि गुणवत्तेसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. १६ जून १९९५ रोजी शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून त्यांनी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या कार्यकाळात संबंधित शाळांमध्ये १०० टक्के पटनोंदणी, नियमित उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावलेला राहिला आहे.
केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता त्यांनी सापे तर्फे तुडील येथील शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा 'आदर्श शाळा पुरस्कार' मिळवून देण्यात मुख्य भूमिका बजावली. याशिवाय लोकसहभागातून शाळांचे डिजिटल सक्षमीकरण, गांधारपाले येथे नवीन वर्गखोलीचे बांधकाम, साहिलनगर आदिवासी वाडीत वस्तीशाळा आणि संगणक कक्षांची निर्मिती करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 'माझी शाळा सुंदर शाळा' अभियानात त्यांनी शाळांना जिल्हास्तरावर अव्वल स्थान मिळवून दिले.
शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त त्यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, कोरोना काळातील मदतकार्य, रक्तदान शिबिरे, पूरग्रस्तांसाठी निधीसंकलन आणि गरजू विद्यार्थ्यांना दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून मोलाचे पाठबळ दिले. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी बालवाचनालय, गणित व विज्ञान कोपऱ्याची स्थापना करून नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती राबवली आहे.
त्यांच्या या बहुआयामी आणि निस्वार्थी योगदानाची दखल घेऊन रायगड जिल्हा परिषदेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या १० सप्टेंबर रोजी आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू-भगिनी आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात असून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दरम्यान, आपल्या या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना संजय कोंडविलकर यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबिय व मार्गदर्शकांना दिले. "मला घडवण्याच्या आणि शिक्षण देण्याच्या या संपूर्ण प्रवासात माझे वडील महादेव कोंडविलकर, आई सावित्रीबाई, मावशी आशा चव्हाण आणि काका आबासाहेब चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य व संस्कार लाभले. तसेच डी.एड.च्या काळात मला योग्य दिशा व मार्गदर्शन करणारे सुधीर पाटील आणि इनायतखान देशमुख यांचेही या प्रवासात अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
"हा पुरस्कार म्हणजे माझे विद्यार्थी, सहकारी शिक्षक, शिक्षण विभाग, ग्रामस्थ आणि आंबवली गावाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तेचे शिक्षण पोहोचवणे हेच माझे ध्येय असून, या सन्मानाने माझी सामाजिक व शैक्षणिक जबाबदारी अधिक वाढली आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी कार्यरत राहीन."
संजय महादेव कोंडविलकर (जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते)











