
कुडाळ : "गाव स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव असते," असे प्रतिपादन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायतीचे 'स्वच्छ व हरित गाव' या थीमसाठी राष्ट्रीय स्तरावर नामांकन झाले असून, ही ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष ग्रामसभेत ते बोलत होते.
झाराप गावाने शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेली पावले पाहता, पुणे येथील 'यशदा' संस्थेच्या पथकाने काल (१७ फेब्रु.) गावाची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी ग्रामपातळीवरील कामांची बारकाईने पाहणी करून सरपंच व ग्रामसेवकांना पुढील वाटचालीसाठी मोलाच्या सूचना दिल्या.
या ग्रामसभेला उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, सेवानिवृत्त अधिकारी विनायक ठाकूर, गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पंचायत समिती सदस्य जिजा तेली, सरपंच दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामसेवक सतीश साळगावकर यांच्यासह आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी: गाव स्वच्छ होताना ग्रामस्थांची मनेही स्वच्छ झाली पाहिजेत. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करून झारापला अधिक सुंदर बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
डॉ. प्रसाद देवधर (भगीरथ संस्था): मोठी झेप घेण्यासाठी कधी दहा पावले मागेही यावे लागते. भगीरथ संस्थेच्या माध्यमातून गावात सेंद्रिय शेती, सौरऊर्जा वापर आणि कचरा वर्गीकरणाबाबत प्रभावी जनजागृती केली जात आहे. झाराप गाव हे भविष्यातील शाश्वत विकासाचे 'रोल मॉडेल' ठरेल.
सरपंच दक्षता मेस्त्री: गावातील लोकांचे आरोग्य सुधारावे आणि गाव पूर्णपणे प्लास्टिकमुक्त असावे, हेच आमचे ध्येय आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने हे नक्कीच साध्य होईल.
शाश्वत विकासाचा मंत्र
कार्यक्रमात ओला व सुका कचरा वर्गीकरण, सौरऊर्जेचा वापर आणि सेंद्रिय शेतीवर विशेष भर देण्यात आला. झाराप ग्रामपंचायतीने राष्ट्रीय स्तरावर घेतलेली ही झेप संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.












