
वैभववाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या च्या जयंतीनिमित्त खांबाळे येथे विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती उत्सवानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचाही समावेश करण्यात आला आहे.
शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व मंगेश लोके मित्रमंडळ खांबाळे यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशाळा खांबाळेच्या पटांगणात १९फेब्रु.ला शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी ९ वाजता शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून, ९.३० वाजता नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार होणार आहे.त्यानंतर खांबाळे ते लोरे नं.२ येथील शिवाजी महाराज पुतळा मार्गे वैभववाडी संभाजी चौकापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता महिलांच्या विविध स्पर्धांना सुरुवात होईल. सायंकाळी ४.३० वाजता संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता श्री देव भैरन जोगेश्वरी महिला फुगडी मंडळ, भैरववाडी कुडाळ यांच्याकडून फुगडी सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरूनाथ गुरव व मंगेश लोके मित्रमंडळाचे अध्यक्ष मंगेश लोके यांनी केले आहे.












