संस्कारक्षम पिढी घडविण्याचे 'नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार'चे कार्य वाखाणण्याजोगे !

नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार संस्‍थेचे दशकपूर्ती स्‍नेहसंमेलन थाटात
Edited by:
Published on: February 17, 2026 19:38 PM
views 26  views

सावंतवाडी : "आजची ही गोजिरवाणी मुलेच देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. या बालमनांवर राष्ट्रप्रेम आणि सुसंस्कारांचे बीजारोपण करण्याचे पवित्र कार्य मातृभूमी शिक्षण संस्था करत आहे. डॉ. सोनल लेले, गणेश ठाकूर आणि त्यांच्या टीमने बुद्धिमान व संस्कारक्षम पिढी घडविण्याचा जो संकल्प सोडला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे," असे गौरवोद्गार दै. कोकणसाद आणि कोकणसाद LIVE चे संपादक संदीप देसाई यांनी काढले.

सावंतवाडी येथील मातृभूमी शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार या संस्थेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित 'दशकपूर्ती स्नेहसंमेलन' सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.



दिग्गजांची उपस्थिती आणि ऐतिहासिक मार्गदर्शन

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून इतिहास अभ्यासक व 'शिवराजभूषण' महानाट्याचे निर्माते भूषण साटम उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सोनल लेले, सचिव गणेश ठाकूर, पालक-शिक्षक समिती अध्यक्षा सौ. मोहिनी सावंत, मुख्य शिक्षिका सौ. ऊर्मिला राणे, सौ. केतकी म्हापसेकर, सौ. राधिका खोटलेकर आणि सौ. प्रतिभा गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख अतिथी भूषण साटम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेला ऋणानुबंध अधोरेखित केला. १६ व्या शतकातील माणगाव येथील लढाईत मोगल सैन्याची कशी दैना उडाली, याचा थरारक इतिहास त्यांनी जिवंत शब्दांत मांडला. त्यांच्या या ऐतिहासिक कथनाने पालक आणि विद्यार्थी भारावून गेले होते.

संस्थेचे सचिव गणेश ठाकूर आणि अध्यक्षा डॉ. सोनल लेले यांनी गेल्या १० वर्षांतील प्रवासाचा आढावा घेतला. अभिनयाच्या माध्यमातून जिजाऊ, शिवराय आणि शंभूराजांचे विचार मांडणारे हे पदाधिकारी शैक्षणिक क्षेत्रातूनही राष्ट्राभिमानाचा वारसा पुढे नेत असल्याचे संदीप देसाई यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था भविष्यातही कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रीतेश दाभोलकर यांनी केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांच्या प्रतिसादात आणि टाळ्यांच्या कडकडाटात हा सोहळा दिमाखात संपन्न झाला.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या रंगतदार सादरीकरणांनी आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या डांगी नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच ‘नन्ना मुन्ना राही’, ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, गणपती स्तवन, ‘स्वर्गात आकाशगंगा’, विनोदी बातम्या, समितीची प्रार्थना, मारुतीस्तोत्र, पालकांचे नृत्य व गायन अशा विविध सादरीकरणांनी कार्यक्रमात बहार आणली.