
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेने “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत १५,००० पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावून रोख रुपये ७५ लाखांचे पारितोषिक मिळविले आहे. सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे सलग तिसऱ्या वर्षी हे यश संपादन करता आले आहे.
“माझी वसुंधरा” अभियान पंचमहाभूतांवर (भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश) आधारित असून या तत्वांच्या संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून वर्षभर विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. भूमी या तत्वांतर्गत, नगरपरिषदेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले जसे की, शहरातील विविध भागांत ५,०३५ वृक्षांची लागवड करून हरित आच्छादनात लक्षणीय वाढ करण्यात आली.
सर्व प्रभागांमध्ये वृक्षगणना पूर्ण करून झाडांचे वैज्ञानिक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात आले. शहरात मियावाकी गार्डन विकसित करण्यात आले तसेच बांबू, शेवगा आणि खस यांसारख्या उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच नगरपरिषदेची रोपवाटिका उभारून स्थानिक स्तरावर रोपांची उपलब्धता निर्माण करण्यात आली. एकल वापर प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती मोहीमा, पथनाट्ये आणि विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत सजगता निर्माण करण्यात आली.
शहरातील ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या गांडूळखताला शासनाचे हरित मानांकन प्राप्त झाले आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
माझी वसुंधरा अभियानाच्या वायु तत्वांतर्गत, वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे सायकलिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. नगरपरिषदेने सायकलिंग ट्रॅक तयार करून पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यात आली. उत्सव काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारून हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानाच्या जल तत्वांतर्गत, वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्यात आले आहे ज्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य विनियोग होऊ शकेल. शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवून पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर सुनिश्चित करण्यात आला. शहरातील विविध भागात शोषखड्डे तयार करून भूजल पातळी वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. गणेशोत्सव काळात जलप्रदूषण टाळण्यासाठी तीन कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली तसेच विसर्जन स्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आले. शहरातील सार्वजनिक विहिरींचा गाळ काढून त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानाच्या अग्नी तत्वांतर्गत, शहरात सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील विविध भागांत सोलार हायमास्ट दिवे बसवून ऊर्जा बचतीला चालना देण्यात आली. अक्षय ऊर्जेबाबत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानाच्या आकाश तत्वांतर्गत, वेंगुर्ला नगरपरिषदेत पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकतेसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम, कांदळवन स्वच्छता मोहीम, शहरातील ई-कचरा संकलन मोहीम, स्वच्छ दिवाळी अभियान, मृदा दिवस, आणि बीजबॉल कार्यशाळा यांचा समावेश आहे. याशिवाय पर्यावरणपूरक गणेश सजावट, भित्तीचित्र महोत्सव, किल्ले बांधणी स्पर्धा आणि एको-फ्रेंडली बाप्पा स्पर्धा यासारख्या विवध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा तत्वांचे प्रतीकात्मक दर्शन घडविणाऱ्या रचना उभारण्यात आल्या आहेत. या यशामध्ये नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, विशेषतः स्वच्छता कर्मचारी, पर्यावरण दूत सौ. धनश्री पाटील, “स्वच्छतादूत माझा वेंगुर्ला” उपक्रमाशी संबंधित सदस्य तसेच सर्व नागरिकांचे मोलाचे योगदान आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल बोलताना नगराध्यक्ष दिलीप लक्ष्मण गिरप यांनी नमूद केले की, हे यश केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून वेंगुर्ला शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. नगरपरिषद पुढील काळातही पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांना अधिक बळकटी देणार असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून शहर अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत अधिक प्रभावी नियोजन करून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली असून भविष्यातही हा लोकसहभाग कायम राहील, असा विश्वास नगरपरिषदेमार्फत व्यक्त करण्यात आला.












