LIVE UPDATES

विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपमधून ‘युवागंध’

स. ह. केळकर महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 01, 2026 07:16 PM
views 26  views

देवगड :  खास दिवाळी सणानिमित्त पारंपरिक सुगंधी उटण्याला व्यावसायिक स्वरूप देत श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवगड येथील करिअर कट्टा समितीच्या बिझनेस क्लब अंतर्गत विद्यार्थ्यांनी ‘युवागंध’ या सुगंधी उटण्याच्या स्टार्टअपची सुरुवात केली आहे. या स्टार्टअप उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयात उत्साहात पार पडले.

विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी, त्यांना व्यवसायाच्या संधींची ओळख व्हावी तसेच स्वतःच्या कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप देता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सुगंधी उटण्याची निर्मिती केली असून त्याला ‘युवागंध’ असे आकर्षक नाव दिले आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे व उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण सुरवसे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी विद्यार्थ्यांच्या या कल्पक उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा युवागंध केवळ महाविद्यालयापुरता मर्यादित न राहता देवगडमधील प्रत्येक घराघरांत दरवळला पाहिजे. देवगडच्या प्रत्येक घरापर्यंत हा युवागंध पोहोचविण्याचे काम विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने करावे.” विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच व्यवसायाची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यास त्यांच्यात नेतृत्व, संवादकौशल्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनी दिवाळीच्या पारंपरिक संस्कृतीमध्ये सुगंधी उटण्याचे असलेले महत्त्व विशद केले. दिवाळीच्या अभ्यंगस्नानामध्ये उटण्याला विशेष स्थान असून भारतीय परंपरा आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचा सुंदर संगम या उत्पादनातून दिसून येतो. विद्यार्थ्यांनी पारंपरिक उत्पादनाला आधुनिक व्यावसायिक स्वरूप देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतःच्या कल्पनांमधून रोजगाराच्या संधी निर्माण करणारे उद्योजक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या स्टार्टअप उपक्रमाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती आणि शुभारंभ करताना करिअर कट्टा समन्वयक डॉ. चंद्रकांत भेंकी, प्रा. शामली तारी व प्रा. अमोल तेली यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्पादन निर्मिती, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यावसायिक दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रत्यक्ष व्यवसाय उभारणी, ग्राहकांशी संवाद, उत्पादनाची जाहिरात आणि बाजारपेठेतील संधी यांचा अनुभव मिळणार आहे. ‘युवांच्या कल्पनेतून, कोकणच्या मातीच्या सुगंधातून’ ही संकल्पना घेऊन सुरू झालेला ‘युवा गंध’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय क्षमतेला नवी दिशा देणारा ठरणार आहे.