
देवगड : ग्रामीण भागातील सांडपाण्याची समस्या दूर करून स्वच्छता आणि भूजल संवर्धनाला चालना देण्यासाठी देवगड पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात ‘घर तेथे शोषखड्डा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मिठबाव येथे शोषखड्डा उभारणीच्या कामाचा शुभारंभ पंचायत समिती देवगडचे उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने गावात गृहभेटी देत ग्रामस्थांमध्ये शोषखड्ड्याच्या महत्त्वाबाबत जनजागृतीही करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत रोजगार हमी व आजीविका मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाचे पाणी तसेच घरगुती सांडपाणी योग्य पद्धतीने जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे, परिसरातील अस्वच्छता कमी करणे आणि गावाचे पर्यावरण स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
मिठबाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दीपक सहदेव मेस्त्री आणि विठ्ठल मधुकर मल्हार यांच्या जागेत शोषखड्डा उभारणीच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अनंत लाड, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी सोमवाड, ग्राम रोजगार सहाय्यक सुहास मिठबावकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम कदम, विभाग अध्यक्ष शैलेश लोके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
केवळ शोषखड्ड्यांची उभारणी करून न थांबता प्रत्येक घरापर्यंत या उपक्रमाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. मिठबाव परिसरातील विविध घरांना भेटी देऊन ग्रामस्थांना शोषखड्ड्याची आवश्यकता, त्याचे पर्यावरणीय फायदे आणि घरगुती सांडपाण्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
घरातून बाहेर पडणारे सांडपाणी उघड्यावर सोडल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. अशा समस्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक घरात शोषखड्डा असणे आवश्यक आहे. या माध्यमातून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होण्याबरोबरच जमिनीतील पाण्याचे संवर्धन करण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘प्रत्येक घरात शोषखड्डा, स्वच्छतेचा गावोगावी ध्यास’ या संकल्पनेतून सुरू असलेले हे अभियान मिठबावमध्येही प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला असून, ग्रामीण स्वच्छता आणि भूजल संवर्धनाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








