
सिंधुदुर्गनगरी : विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील युवकांच्या कल्पकतेला, नेतृत्वगुणांना आणि नवोपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘विकसित भारत युवा लीडर्स संवाद’ (VBYLD) उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग’चे जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
‘विकसित भारत युवा लीडर्स संवाद’ अंतर्गत युवकांसाठी विविध क्षेत्रांमध्ये सहा प्रमुख ट्रॅक्स निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये विकसित भारत चॅलेंज, सांस्कृतिक उपक्रम, डिझाईन फॉर भारत, हॅक फॉर सोशल कॉज, युवा उद्योजक चॅलेंज आणि युवा संसद यांचा समावेश आहे.
‘विकसित भारत चॅलेंज’मध्ये क्विझ, निबंध आणि सादरीकरणाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कल्पना मांडता येणार आहेत. ‘सांस्कृतिक उपक्रम’ मध्ये लोकनृत्य, लोकसंगीत, चित्रकला, वक्तृत्व व कथाकथन अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. ‘डिझाईन फॉर भारत’ मध्ये स्थानिक विकासाच्या आव्हानांवर तंत्रज्ञान-केंद्रित उपाय सुचविण्याची संधी मिळणार आहे.
तसेच ‘हॅक फॉर सोशल कॉज’ मध्ये सामाजिक व विकासात्मक समस्यांवर डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित उपाय शोधता येतील. ‘युवा उद्योजक चॅलेंज’ मध्ये स्टार्टअप संकल्पना व व्यवसाय योजना सादर करता येणार असून, ‘युवा संसद’ मध्ये देशाच्या विकासाशी संबंधित विषयांवर युवकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नेतृत्व, नवोपक्रम, उद्योजकता, डिजिटल कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील तसेच विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग’चे जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी केले आहे.
सिंधुदुर्गातील युवक-युवतींना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. उपक्रमाच्या अंतिम सादरीकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याने युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










