
देवगड : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU ) येथे २ व ३ सप्टेंबर२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या "Life and Legacy of Chhatrapati shivaji Maharaj -Jayishnu saviour of Sahishnu Bharat " या राष्ट्रीय अधिवेशनात कुणकेश्वर येथील इतिहास संशोधक रणजीत हिर्लेकर यांनी आपले कुणकेश्वर मंदिरा विषयीचे संशोधन सादर करून कुणकेश्वरचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि रायगड स्मारक मंडळ, पुणे यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील २२ राज्यांमधून ६०० हून अधिक इतिहास संशोधक, प्राध्यापक व रिसर्च स्कॉलर्स सहभागी झाले होते. या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी JNU च्या कुलुगरु डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित, भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते व राज्यसभा खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी, तंजावरच्या भोसले घराण्याचे वंशज बाबाजी राजे भोसले, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे तसेच रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीरजी थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
अखिल भारतीय स्तरावर झालेल्या राष्ट्रीय परिषदेत (National Conferance) JNU दिल्लीच्या व्यासपीठावर मोजक्या संशोधकांना आपले रिसर्च पेपर सादर करण्याची संधी मिळाली. या मोजक्या संशोधकांमध्ये रणजित हिर्लेकर यांचा समावेश झाला.
आपल्या संशोधन लेखात "कुणकेश्वर मंदिराशी छत्रपती शिवरायांचा संबंध आला होता," हे सिद्ध करताना सातारच्या शाहू छत्रपतींचे एक नुकतेच सापडलेले पत्र यावेळी हिर्लेकर यांनी उजेडात आणले. याशिवाय अनेक संदर्भ देत श्रीकुणकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराची सुरुवात छत्रपती शिवरायांमुळे कशी झाली, या जिर्णोद्धाराच्या कामासाठी शिवरायांचे अमात्य नारो निळकंठ व अमात्य रामचंद्र पंत या बंधुंनी केलेली धडपड व अखेर करवीरकर छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेने कुणकेश्वर मंदिराचा झालेला जीर्णोद्धार या विषयीचे आपले संशोधन श्री. रणजित हिर्लेकर यांनी यावेळी संदर्भासह मांडले. लवकरच हा संशोधन लेख जेएनयु च्या रिसर्च बुक मधून प्रकाशित होईल.
दोन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय धोरण, सुशासन, लष्करी रणनीती, आरमार, दक्षिण दिग्विजय, मराठा साम्राज्याचा विस्तार आणि आधुनिक भारतातील शिवचरित्राचे महत्त्व या विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा व महत्त्वपूर्ण निवडक संशोधन लेख सादर झाले. अधिवेशनाच्या समारोप सत्रात कुलगुरू शांतीश्री पंडित,सुधीर थोरात, डॉ. केदार फाळके, प्रा. सुनील डांगे, प्रा. हिरामण तिवारी, तसेच SIS चे डीन प्रा. मुठू उपस्थित होते.










