LIVE UPDATES

sindhudurg SIR : कोणतेही नाव सुनावणी घेतल्याशिवाय मतदार यादीतून वगळू नका

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश : मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 15:30 PM
views 46  views

सिंधुदुर्गनगरी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) मतदार यादीतील त्रुटी दूर करणे आणि दावे-हरकतींवर पारदर्शक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न झाले. कोणत्याही मतदाराचे नाव पुरेशी सुनावणी घेतल्याशिवाय वगळले जाऊ नये. पुनरीक्षण प्रक्रियेचा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी दिले. 

गणेशोत्सवाच्या काळात गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक उपलब्ध असतात, त्या वेळेचा सदुपयोग करून गावपातळीवर पारदर्शक पद्धतीने सुनावणीचे नियोजन करा आणि नागरिकांना त्याची पूर्वकल्पना द्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या प्रशिक्षणादरम्यान सुनावणी कक्ष रचना, विसंगत (Anomaly) नावांबाबत करावयाची कार्यवाही, कायदेशीर निर्णय प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी याविषयी उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी नोटीस देणे, पुरावे तपासणीसाठी तांत्रिक पथकांची मदत, रोजनामा नोंदवणे, निर्णय संकेतस्थळावर अपलोड करणे आणि मतदारांच्या सोयीसाठी जवळच्या अंतरावर सुनावणी केंद्र ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांना तांत्रिक सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, जिल्ह्यात राबविलेल्या विशेष सखोल प्रत्यक्ष पडताळणी मोहिमेत पूर्वीच्या ६ लाख ८८ हजार १४ मतदारांपैकी ८२ हजार ५१७ अपात्र नोंदी वगळण्यात आल्या असून प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या आता ६ लाख ५ हजार ४९९ इतकी झाली आहे.

अनमॅप्ड व विसंगत यातील वगळलेल्या आणि दुरुस्तीच्या नावांबाबत मतदार नोंदणी कार्यालयाकडून नोटीस देण्यात येईल त्यानंतर नागरिकांना दावे व हरकती नोंदवता येणार असून, त्यावर २९ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.