LIVE UPDATES

ओरोसच्या महामार्गावरील धोकादायक वळणांवर चालकांचा जीव मुठीत

मजबूत क्रॅश बॅरिअर्स व वेगनियंत्रण उपाययोजना करण्याची योगेश तावडेंची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 15:34 PM
views 76  views

सिंधुदुर्गगरी : महामार्गावरील बेफाम वेगाची वाहने निकृष्ट बॅरिकेड्स तोडून थेट सर्व्हिस रोडवर येत असल्याने ओरोस परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धोकादायक वळणे, वाहनांचा अनियंत्रित वेग आणि अपुरे सुरक्षा उपाय यामुळे सर्व्हिस रोडवर वारंवार अपघात घडत असून, निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ओरोस ग्रामपंचायत सदस्य योगेश राजाराम तावडे यांनी केली आहे.

तावडे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सिंधुदुर्ग-सावंतवाडी प्रकल्प कार्यालयाला दिले आहे. यावेळी परशुराम सावंत उपस्थित होते. महामार्गावरील धोकादायक वळणांवरून जाणाऱ्या वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात असतो. वेगावरील नियंत्रण सुटल्यास ही वाहने महामार्ग आणि सर्व्हिस रोडदरम्यान लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स तोडून थेट सर्व्हिस रोडवर येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

महामार्ग आणि सर्व्हिस रोड विभक्त करण्यासाठी बसविण्यात आलेले बॅरिकेड्स वाहनांच्या धडकेचा सामना करण्यास सक्षम नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडवरून जाणारे दुचाकीस्वार, पादचारी आणि स्थानिक वाहनचालक यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सर्व्हिस रोडवरून प्रवास करताना जीव मुठीत घेण्याची वेळ आली आहे.

अपघातानंतर उपाययोजना करण्याची वाट न पाहता आताच सुरक्षा वाढवा, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. महामार्गाच्या धोकादायक वळणांवर उच्च दर्जाचे क्रॅश बॅरिअर्स किंवा आरसीसी सुरक्षा भिंती उभाराव्यात, योग्य ठिकाणी रंबल स्ट्रिप्स बसवाव्यात, वेगमर्यादेचे स्पष्ट फलक लावावेत तसेच संपूर्ण परिसराची सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपघाताची वाट न पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली आहे. 

आंदोलनाचा इशारा

महामार्गाच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या संरक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी दिला आहे.