
सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात गेल्या २०० ते ३०० वर्षांपासून दीड दिवस पाच फणी नागपूजन करण्याची परंपरा जपली जात आहे. प्रथेप्रमाणे यावर्षी नागपंचमीला पाच फणांच्या नागाचे पूजन तेथे करण्यात आले.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे. पारंपरिक सण-उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राणिमात्रांविषयी प्रेमभावना, निसर्ग-संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमीकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखविला जातो.
नागपंचमीला इतर ठिकाणी सकाळी मूर्ती आणून सायंकाळी अळवाच्या पानांखाली त्याचे विसर्जन केले जाते. मात्र, मळगावच्या गोसावी घराण्यात दीड दिवस पाच फडांच्या नागोबाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राह्मण भोजन व एकादष्णी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा करण्यात येते.
पंचमीला नागोबाचे विधिवत पूजन करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारी नागाला करंज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. सायंकाळी अळवाच्या पानांमध्ये नागाचे विसर्जन केले जाते. महिलांचा ‘ओवसा’, फुगड्या कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून मूर्तीभोवती आकर्षक आरास करण्यात आली. त्यानंतर नागोबाचे विधिवत पूजन करण्यात आले. दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. संध्याकाळी गोसावी घराण्यातील महिलांचा “ओवसा” तर सायंकाळी भजन-फुगड्या आदी कार्यक्रम आहेत.










