LIVE UPDATES

SINDHUDURG NEWS : वंचित समाजाच्‍या मागणीची कामे प्रगती पथावर

पालकमंत्री नीतेश राणेंची माहिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 10, 2026 15:05 PM
views 17  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली : गतवर्षी मी वंचित समाजाचा जनता दरबार घेतला. त्‍यात जिल्‍हाभरातील वंचित समाज वस्‍त्‍यांमधील ४२९ निवेदने प्राप्‍त झाली. आमच्‍या पाठपुराव्‍यामुळे १७.१७ कोटींची कामे होणार आहेत. यातील २२ कामे पूर्ण झाली असून १०९ कामे प्रगतीपथावर असल्‍याची माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.

येथील ओमगणेश निवासस्‍थानी पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, २६ जूलै २०२५ रोजी सिंधुदुर्गात वंचित समाजाचा पहिला जनता दरबार घेतला. या दरबारात जिल्‍हाभरातील वंचित समाजातील मंडळींची मिळून एकूण ४२९ निवेदने प्राप्‍त झाली. या समस्‍या स्‍थानिक पातळीपासून मंत्रालयीन पातळीपर्यंतच्‍या होत्‍या. आमचा जनता दरबार कोणत्‍याही प्रसिद्‍धीसाठी नसून जनतेच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी असतो. त्‍यामुळे प्राप्‍त झालेल्‍या समस्‍याविषयक निवेदनांचा वर्षभर पाठपुरावा केला. पहिल्‍या टप्‍प्यात १३.३९ कोटींचे टेंडर काढण्‍यात आले आहे. मंत्रालय स्‍तरावर साडेतीन कोटींचा प्रस्‍ताव पाठविण्‍यात आला आहे. जिल्‍ह्यात वंचित समाज वस्‍त्यांमध्‍ये तब्‍बल १७.१७ कोटींची कामे होणार आहेत. दाखल निवेदनातील २२ कामे पूर्ण झाली असून १०९ कामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे दर्जेदार करण्‍यात येणार आहेत. 

राणे पुढे म्‍हणाले, राज्‍यात पहिल्‍यांदाच वंचित समाजाचा जनता दरबार भरवला गेला होता. त्‍यात गावांमधील जातीविषयक नावे देखील बदलण्‍यात आली. आता गणेशोत्‍सवानंतर दुसरा जनता दरबार देखील होणार आहे. वंचित समाजाच्‍या विकास, आर्थिक उन्‍नतीसाठी माझ्‍यासह मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर व नीलेश राणे असे सगळेच काम करत आहोत. आम्ही कृतीतून विकास दाखवत आहोत. जिल्‍हाधिकारी व प्रशासनातील सर्वच अधिकार्‍यांनी यासाठी मेहनत घेतली असून लोकाभिमूख कारभार आम्‍ही देत आहोत. जिल्‍ह्यातील दरडोई उत्‍पन्‍न वाढवायचे असेल तर प्रत्‍येक समाजाची आर्थिक सुधारणा होणे गरजेचे आहे. त्‍यासाठीच आम्‍ही प्रयत्‍नशील असल्‍याचेही राणे म्‍हणाले. 

गणेशोत्‍सवात अधिकार्‍यांना सुट्‍टी नाही
पालकमंत्री या नात्‍याने मी दर मिनिटाला प्रशासकीय अधिकार्‍यांच्‍या संपर्कात असतो. गणेशोत्‍सव संपेपर्यंतम सर्वच अधिकार्‍यांनी २४ तास 'अलर्ट' रहावे, अशा सूचना मी केल्‍या आहेत. या कालावधीत कोणत्‍याही अधिकार्‍याला सुट्‍टी मिळणार नाही. गणेशोत्‍सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्‍याने माझ्‍यासह सर्वच जण या कालावधीत 'अलर्ट मोड'वर असल्‍याचेही राणे म्‍हणाले. 

त्‍यांच्‍यावर कारवाई होणारच
शालेय पोषण आहारात 'एक्‍सापायर' झालेल्‍या वस्‍तू आढळून आल्‍याबाबत संबंधितांशी बोललो आहे. जे दोषी आहेत, त्‍यांच्‍यावर कारवाई होणारच आहे. पण, जिल्‍ह्यात अन्‍न व औषध प्रशासनाची तीन पथके फिरत आहेत. सरकारी प्रमाणपत्राशिवाय कोणत्‍या पदार्थाची विक्री होत असेल तर कारवाई होणारच आहे. विशेषत परप्रांतीय विक्रेते सिंधुदुर्गात मोठ्या संख्‍येने असून त्‍यांच्‍याकडून असे प्रकार होत आहेत. त्‍यामुळे नागरिकांनीही खात्री केल्‍याशिवाय पदार्थ घेऊ नयेत, असेही राणे म्‍हणाले.

राऊतांवर टिका
एकनाथ शिंदे यांचा लंनडमध्‍ये सत्‍कार झाला, याविषयी संजय राऊत यांनी टिका केल्याबाबत बोलताना नीतेश राणे म्हणाले, संजय राऊत यांचा मालक लंनडला सातत्‍याने जात असतो. लंडनला तिसरी 'मातोश्री' असल्‍याचे बोलले जात असून त्‍याचा हिशेब संजय राऊत यांनी द्‍यावा. एकनाथ शिंदे यांचा लंडनमध्‍ये सत्‍कार झाला, याचे कौतुक व्‍हायला हवे, असेही राणे म्‍हणाले. राऊत यांच्‍या मालकाच्‍या मुलावर तसेच उबाठाच्‍या नेत्‍यांवर दिशा सालियान खून प्रकारणी आरोप होत असल्‍याचेही राणे म्‍हणाले.