LIVE UPDATES

भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानांतर्गत २८ व २९ सप्टेंबरला विशेष शिबिरे

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 26, 2026 18:48 PM
views 16  views

सिंधुदुर्गनगरी : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना, ओळखपत्रे व प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी कळविले आहे.

या अभियानादरम्यान आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास/अधिवास दाखला, विवाह नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी शिबिरांचा आवर्जून लाभ घ्यावा

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील ज्या नागरिकांकडे आवश्यक ओळखपत्रे, प्रमाणपत्रे उपलब्ध नाहीत किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ अद्याप मिळालेला नाही, अशा नागरिकांनी संबंधित शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून या अभियानाचा आवर्जून लाभ घ्यावा. लाभार्थ्यांनी उपलब्ध असलेली आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. पात्र लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील शिबिरे सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अन्नपूर्णा हॉल, गोठोस तिठा जवळ,  मौजे गोठोस, ता. कुडाळ आणि कणकवली नगरपंचायत ग्रंथालय हॉल, ता. कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहेत. तसेच मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ग्रामपंचायत, मौजे चौकुळ, ता. सावंतवाडी येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.