LIVE UPDATES

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार ?

हवामान विभागाचा हा आहे अंदाज
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 19, 2026 12:57 PM
views 121  views
#kokansadlive#news update#konkan update#

मुंबई : राज्यात यंदा पावसाने मोठी तूट निर्माण केली असून १८ सप्टेंबरपर्यंत पावसाची सरासरी तूट १७ टक्क्यांवर पोहोचली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने तुटीत काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे.

२० ते २५ सप्टेंबरदरम्यान घाटमाथा आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे काही भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून १९ सप्टेंबरनंतर त्याची तीव्रता वाढू शकते. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मॉडेलच्या आधारे केलेल्या विश्लेषणानुसार रविवारपासून पावसाचा जोर वाढून तो बुधवार किंवा गुरुवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. घाट परिसरात या काळात मुसळधार पाऊस होऊ शकतो, तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

मात्र, आगामी पावसामुळे राज्यातील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघेल, अशी शक्यता कमी असल्याचे हवामान संशोधन व सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या पावसानंतर राज्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे चित्र आहे.

परतीच्या पावसाकडून अपेक्षा कमी

यंदाच्या हंगामातील उर्वरित कालावधीत परतीच्या पावसाकडून राज्याला मोठा फायदा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत होणाऱ्या पावसाकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.