
सावंतवाडी : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावंतवाडीत दरवर्षी प्रमाणेच अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना निर्माल्य हे कलशात टाकण्याची विनंती त्यांनी केली. या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.
मोती तलाव काठावर यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला होता. यामध्ये प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांकडून निर्माल्य जमा केलं गेलं. प्रतिष्ठानच्या केंद्रावर खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून तिथे या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.
त्यानंतर हे खत झाडांना घातलं जाणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यात विविध ठिकाणी लावलेल्या झाडांना हे खत घालण्यात येणार आहे.










