
वेंगुर्ला : वादळी वा-यासह लागत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी सायंकाळी वादळी वा-यासह लागलेल्या जोरदार पावसाने वेंगुर्ला तालुक्यात सुमारे 50 हजार रूपयांच्यावर आर्थिक नुकसान झाले आहे. तर या वादळी वा-याने वायंगणी येथील सार्वजनिक स्मशानभूमीचे पत्रेही उडून गेले आहेत.
गेले काही दिवस जिल्ह्रात वादळी वा-यासह पाऊस लागत आहे. सोमवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी वादळी वारा सुरू होता. मध्यरात्रीसह मंगळवारपर्यंत अधूनमधून येणा-या वादळी वा-याने ठिकठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले आहे.
यामध्ये सुंदरभाटले येथील दीपक शिंदे यांच्या घराचे पत्रे उडून अंदाजे 8 हजार रूपयांचे नुकसान, तेथीलच मोहन यादव यांच्या घराची कौले फुटून अंदाजित 750 रूपयांचे नुकसान, वेतोरे-पालकरवाडी येथील शांती पालकर यांच्या शौचालयावर झाड पडून दीड हजार रूपयांचे नुकसान, वायंगणी-तळेकरवाडी येथील मंगश केळुसकर यांच्या घरावर झाड पडून 30 हजार रूपयांचे नुकसान, वायंगणी येथील रामचंद्र मसुरकर यांच्या घरावर झाड पडून 14 हजार रूपयांचे नुकसान, वायंगणी येथील दशरथ गवंडे यांच्या घरावर झाड पडून 15 हजार रूपये असे एकूण 69 हजार 250 रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी 8 ते मंगळवारी सकाळी 8 पर्यंत तालुक्यात 24 मिमी पावसाची नोंद झाली आहे.










