
दोडामार्ग : तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, बाराव्या किलोमीटर अंतरावर असलेल्या झरेबाबर साईनगर येथे कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. भेडशी ते पिकुळे रस्त्यालगत असलेल्या या कालव्याला यापूर्वीही मोठी गळती लागली होती. मात्र, जलसंपदा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि तात्पुरत्या मलमपट्टीमुळे आता हा कालवा कधीही फुटण्याची भीती निर्माण झाली असून, परिसरातील शेती व बागायती धोक्यात आल्या आहेत.
जलसंपदा विभागाचा 'ताडपत्री'चा जावईशोध!- काही महिन्यांपूर्वी कालव्याला लागलेली गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने तेथे केवळ ताडपत्री झाकून ठेवली होती. मात्र, काही दिवसांतच ती ताडपत्री तिथून गायब झाली. यावर उपाययोजना करण्याऐवजी "ताडपत्री चोरून नेली" असा अजब आणि जावईशोध जलसंपदा विभागाने लावला होता. याबाबत कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून देण्यात आली होती आणि त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
पावसामुळे धोका वाढला; शेतकरी आक्रमक- सध्या सुरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कालव्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पाण्याचा दाब वाढल्यास हा कालवा कोणत्याही क्षणी फुटू शकतो. तसे झाल्यास परिसरातील शेती आणि शेकडो एकर बागायतीमध्ये पाणी घुसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
"कालव्याची ही गंभीर अवस्था पाहून आम्ही प्रचंड भीतीखाली आहोत. जलसंपदा विभागाने तात्काळ याची दखल घेऊन उपाययोजना करावी आणि आमची शेती वाचवावी."— आनंद नाईक, स्थानिक शेतकरी
गोवा राज्याच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता- तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या याच डाव्या कालव्यातून शेजारील गोवा राज्याला मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या अनेक वर्षांत या कालव्यांची योग्य प्रकारे देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कालवे कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असून, याचा थेट फटका गोवा राज्याच्या पाणीपुरवठ्याला बसत आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी- 'येत्या काळात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी जलसंपदा विभागाने सुस्तपणा झटकून काम करावे आणि या भगदाडाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी,' अशी तीव्र मागणी तिलारी प्रकल्पग्रस्त बांधव, साईनगरवासीय आणि स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.











