LIVE UPDATES

रिगल कॉलेजमध्‍ये रानभाजी पाककला स्‍पर्धा उत्‍साहात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 13:47 PM
views 89  views

कणकवली : जानवली येथील रिगल महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनोखा वारसा जपत आपल्या पाककौशल्याचे उत्कृष्ट दर्शन घडविले. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून आकर्षक आणि पौष्टिक पदार्थ तयार केले. रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पौष्टिक मूल्य आणि ग्रामीण खाद्यपरंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

स्पर्धेचे परीक्षण रिलॅक्स हॉटेलच्या मालक लीना काळसेकर, रिलॅक्स हॉटेलचे शेफ, अपर डेक हॉटेलचे शेफ तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पार्थ पावसकर यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे, चवीचे, पोषणमूल्यांचे आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी त्रिवेणी भाजी, अळू, काळ्या पान, रान केळफुल, कुडाची भाजी, अळंबी, पेवगा, टाकळा आदी विविध रानभाज्यांपासून पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ सादर केले. काही विद्यार्थ्यांनी स्थानिक खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविले तर काहींनी नावीन्यपूर्ण प्रयोग करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 

स्पर्धेत हर्ष कदम (तृतीय वर्ष हॉटेल मॅनेजमेंट) याने प्रथम, काशिश चव्हाण (प्रथम वर्ष हॉटेल मॅनेजमेंट) हिने द्वितीय, श्रेयस इंदुलकर (प्रथम वर्ष हॉटेल मॅनेजमेंट) याने तृतीय क्रमांक पटकावला. प्राची घाडी (तृतीय वर्ष बी. सी.ए) दिशा परब आणि रुपाली चव्हाण (तृतीय वर्ष बी. सी.ए) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.