LIVE UPDATES

पाणी पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराचा ‘गॉडफादर’ कोण ?

कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी यांचा सवाल
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 14:27 PM
views 46  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेतील कथित पाणी गैरव्यवहारासंदर्भात काही व्यक्तींच्या वक्तव्यांमधून गंभीर आरोप समोर आले आहेत. संबंधित व्हिडिओमध्ये नगरसेवक पाणी पुरवठा सभापती यांच्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करणे आवश्यक आहे. या प्रकरणात एखादी व्यक्ती दोषी आहे की नाही, हे चौकशीतून स्पष्ट होईल. मात्र, जर या गैरव्यवहारामागे मोठे जाळे किंवा राजकीय संरक्षण असल्याचे आरोप होत असतील तर त्यामागील ‘गॉडफादर’ कोण ? हे देखील समोर आलं पाहिजे अस मत कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. समीर वंजारी यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, या प्रकरणाची पाळेमुळे नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहेत हे देखील पहावं लागेल. कारण, हे एकट्याचं काम नसून या पाठीमागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याचाही तपास झाला पाहिजे. 

संबंधित व्यक्तीने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत केलेले वक्तव्यही गंभीर आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी ॲड. वंजारी यांनी केली. या प्रकरणाबाबत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी स्तरावर यापूर्वी काही चौकशी झाली असल्यास त्या चौकशीचे निष्कर्ष काय होते ? त्यावर कोणती कार्यवाही झाली ? हे जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे. 

त्यामुळे आता या प्रकरणात पुन्हा स्वतंत्र व सखोल चौकशी होणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबींची कागदपत्रे, निविदा, देयके आणि प्रशासकीय निर्णयांच्या आधारे चौकशी करण्यात यावी. हा जनतेचा पैसा आहे. सार्वजनिक निधीच्या वापराबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा, काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ॲड. वंजारी यांनी दिला.