
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ आदर्श असा निर्माण करून तो क्रमांक एकवर नेण्याचा माझा प्रयत्न असेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांनी व्यक्त केला. तळवडे मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज येथील श्री देव भूतनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून व देवदर्शन घेऊन श्री. गावडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी श्री. गावडे म्हणाले, माझे सध्याचे प्रतिस्पर्धी आणि मी एकाचवेळी पंचायत समिती सदस्य म्हणून राजकारणात पदार्पण केले. मात्र, त्यानंतर मी सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत सातत्याने विविध विकासात्मक उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सोलर पॅनेलच्या माध्यमातून अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी आपण काम केल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी कोणते उपक्रम राबविले हे बघता त्याची तुलना जनतेने करावी, असे आवाहनही केले. तर तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा असलेले ज्येष्ठ नेते प्रमोद गावडे यांची आपण भेट घेतली असून त्यांची आपल्याबाबत कोणतीही नाराजी नाही. त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले असून लवकरच ते मुख्य प्रवाहात येऊन साथ देतील. विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न, काजू उद्योजकांचे प्रश्न यांसह सर्व मुद्दे मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने काम केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात तळवडे मतदारसंघाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेत क्रमांक एकवर नेण्याचा आपला ठाम मानस असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी श्री देव भूतनाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणं घालून श्रीफळ वाढवण्यात आले. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते












