
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल दिसून येत आहे. उबाठा शिवसेनेला रामराम ठोकणारे सतीश सावंत आणि भाजप आमदार नितेश राणे हे एकत्र आल्याचा फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वीच सतीश सावंत यांनी उबाठा सेनेचा राजीनामा दिला होता. मात्र, राजीनाम्यानंतर पुढची राजकीय दिशा काय असेल, याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केलेला नव्हता. अशातच आज भिरवंडे येथील श्री रामेश्वर मंदिरात नितेश राणेंसोबत त्यांची उपस्थिती अनेक तर्क-वितर्कांना जन्म देत आहे.
विशेष म्हणजे, या मंदिरात नितेश राणे नेहमीच दर्शनासाठी जात असले तरी, गेल्या काही काळात त्यांच्या स्वागतासाठी किंवा सत्कारासाठी सतीश सावंत दिसत नव्हते. त्या ठिकाणी प्रामुख्याने गोट्या सावंत यांचीच उपस्थिती असायची. मात्र आज सतीश सावंत स्वतः नितेश राणेंसोबत दिसल्याने राजकीय समीकरणे बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
उबाठा सेनेतून बाहेर पडल्यानंतर सतीश सावंत नेमके कुठे जाणार, याबाबत संभ्रम असतानाच हा फोटो समोर आल्याने “सतीश सावंत पुन्हा राणेंच्या चमूमध्ये सामील होणार का?”, असा सवाल आता जोर धरू लागला आहे.
भाजप प्रवेशाची ही नांदी तर नाही ना, अशी चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय घडामोडीचा क्षण अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, सतीश सावंत यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











