सावंतवाडीकरांना अपेक्षित विकास निश्चितच करून दाखवू

नगराध्यक्षपदी निवडून आल्या आल्या श्रद्धाराजेंचा शब्द
Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2025 19:06 PM
views 76  views

सावंतवाडी : नगरपालिकेत झालेला आमचा विजय हा सर्व सावंतवाडीकरांचा विजय आहे. ज्या सावंतवाडीकरांना शहराचा विकास अपेक्षित आहे त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले. निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या होत्या या सर्व समस्या दूर करून सावंतवाडी शहराला सुंदर व विकसित शहर बनविण्याचे आमचे स्वप्न आहे व आमचे निश्चितच पूर्ण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांचे आशीर्वाद व पालकमंत्री नितेश राणे व माझ्या सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने सावंतवाडीकरांना अपेक्षित असा विकास निश्चितच करून दाखवू, असा विश्वास सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी व्यक्त केला.

       

 त्या म्हणाल्या, सावंतवाडीतील नागरिकांनी राजघराण्याला नेहमीच आपलं प्रेम व आशीर्वाद दिले आहेत. राजघराणेने देखील सावंतवाडीच्या जनतेसाठी नेहमीच भरभरून दिले आहे. राजघराण्याचा हा लोकसेवेचा वारसा यापुढेही सुरू ठेवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपले आई-वडील तसेच राजघराण्यातील जेष्ठ मंडळींचे आशीर्वाद व त्यांनी दिलेला पाठिंबा यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले असेही त्यांनी आवर्जून सांगितले. सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव ही सावंतवाडीची शान असून तो अधिक सुंदर व आकर्षक बनविण्यासाठी काम करू. त्याचबरोबर जनतेला आवश्यक असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी तसेच येथील आरोग्य सुविधा अधिक सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न करणार, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.