
दोडामार्ग : विजघर ते तिलारी राज्य मार्गाच्या रुंदीकरण कामावरून निर्माण झालेल्या वादाला आता थेट गुन्हेगारी वळण लागले आहे. रस्त्याच्या कामात अडथळा करून मारहाण व जमाव या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
ही घटना १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गावरील मुळस–खराडी ब्रिज परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर अनंता गुजर (वय ३८, मूळ रा. भोंदवडे, ता. जि. सातारा; सध्या रा. साटेली भेडशी, ता. दोडामार्ग) यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी हे त्यांच्या कंपनीमार्फत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित असताना संशयितांनी कामात अडथळा निर्माण केला, असा आरोप आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, संशयितांनी फिर्यादीचा मोबाईल फोन फोडून नुकसान केले. तसेच हाताच्या थापटाने मारहाण करत शिवीगाळ केली आणि गाड्या फोडून आग लावण्याची धमकी दिली. फिर्यादी ज्ञानेश्वर गुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, संदेश राणे, संतोष मोर्ये, विजय जाधव, मिलिंद नाईक यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३२४(२), ३५२, ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत करत आहेत.
दरम्यान, रस्ता कामातील अनागोंदी कारभाराविरोधात जाब विचारणाऱ्या थेट ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांवर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.













