
वैभववाडी : पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचे स्मारक केवळ वास्तू न राहता त्यांच्या साहित्याचा, संघर्षमय जीवनप्रवासाचा आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे केंद्र बनावे, अशी अपेक्षा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. हेत येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या स्मारकाचे भूमिपूजन करताना त्यांनी वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण करण्याची घोषणा केली.
पद्मश्री कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हेत येथे त्यांच स्मारक उभारले जात आहे.याच भुमिपुजन मंत्री नितेश राणेंच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.
मंत्री राणे पुढे म्हणाले,नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात येणारे हे स्मारक केवळ वास्तू न राहता त्यांच्या जीवनप्रवासाची, साहित्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख करून देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुर्वे यांनी कोणत्या परिस्थितीत जीवन जगले, त्यांच्या कविता कोणत्या सामाजिक वास्तवातून आकाराला आल्या आणि कष्टकरी समाजाच्या व्यथा त्यांनी कशा मांडल्या, याची माहिती भावी पिढीला मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले.
स्मारक परिसरात वाचनालय, बहुउद्देशीय सभागृह, कार्यालय, बाहेरील बाजूस बहुउद्देशीय व्यासपीठ आणि स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. स्मारकाच्या माध्यमातून सुर्वे यांच्या साहित्याचा आणि विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी आवश्यक नियोजन केले जाईल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.स्मारकाचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबरोबरच त्याची नियमित स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्ती होणेही आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्मारकांची उभारणी झाल्यानंतर देखभालीकडे दुर्लक्ष होते. हेत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी या स्मारकाची गुणवत्ता टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच देखभालीची जबाबदारी कोणत्या यंत्रणेकडे असेल, हे स्पष्ट करून योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
वैभववाडीतील महाराणा प्रताप स्मारकाचा संदर्भ देत त्यांनी नारायण सुर्वे स्मारकाच्या कामावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले. निर्धारित मुदतीत किंवा त्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच ते पुढे म्हणाले,स्मारकाच्या भूमिपूजनाला खासदार नारायण राणे यांना उपस्थित राहण्याची इच्छा होती. मात्र, स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्यांना या वास्तूचा अनुभव घेता यावा, यासाठी उद्घाटनाला निमंत्रित करण्यात येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी खासदार नारायण राणे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
भाषणादरम्यान नितेश राणे यांनी नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ ही कविता सादर केली.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, भाजप मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, जि.प.सदस्य प्रमोद रावराणे , श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, नासिर काझी, भालचंद्र साठे, प्राची तावडे, देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे यांच्यासह लोकप्रतिनिधी, सुर्वे कुटुंबीय आणि हेत ग्रामस्थ उपस्थित होते.











