
कणकवली : कणकवली मराठा मंडळाजवळील गड नदीपात्रातील केटी बंधाऱ्यावर प्लेट बसवून पाणी अडविण्यात आल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी वेळोवेळी आढावा बैठका घेत पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत.
जलसंपदा विभागाकडून काही दिवसांपूर्वी कनकनगर येथील केटी बंधाऱ्यावरही प्लेट बसवून पाणी अडविण्यात आले होते. त्यामुळे नदीपात्रात पाणी साठण्यास सुरुवात झाली असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा पाणीसाठा परिसरातील विहिरींची तसेच भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.दरम्यान, या केटी बंधाऱ्यांवर जुन्या प्लेटचा वापर करण्यात आल्याने काही ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे अडविण्यात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाण्याची शक्यता आहे. ही गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने जुन्या प्लेटऐवजी नवीन आधुनिक पद्धतीच्या प्लेट बसवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
केटी बंधाऱ्यांमुळे पाणी अडविण्याचा उद्देश चांगला असला तरी योग्य दर्जाच्या नवीन प्लेट बसवून पाण्याची गळती रोखल्यास अधिकाधिक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे जलसंपदा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








