LIVE UPDATES

Sawantwadi News : नाथ पै. सभागृहाच्या देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष द्यावं

स्थानिक नोंदणीकृत संस्थांना भाड्यात सवलत द्यावी : बाळ पुराणिक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 24, 2026 03:30 PM
views 12  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी : सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात स्थानिक नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थांना भाड्यात सवलत मिळावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. नगराध्यक्षांकडून त्यादृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले गेले आहे अशी माहिती नाट्य कलावंत, दिग्दर्शक बाळ पुराणिक यांनी दिली. तसेच प्रशासनाकडून सभागृहाच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्तीकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी श्री. पुराणिक यांनी केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना ते बोलत होते. 

श्री. पुराणिक म्हणाले, सावंतवाडीतील नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थांना नाट्यगृह मोफत न देता किमान ५ हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी  आम्ही केली आहे. दिवसाला १८ हजार रूपये ही रक्कम परवडणारी नसून सांस्कृतिक चळवळीसाठी देणगी घेऊन, तिकीट शुल्क आकारुन निधी उभारण्यासाठी प्रयत्न केल जातो.  सुमारे १७-१८ हजार रुपये भाडे आकारल्यास तीन दिवसांच्या महोत्सवासाठी ५५ हजार रुपये मोजणे संस्थांना परवडणारे नाही. यात सवलत मिळाल्यास सांस्कृतिक उपक्रम करणे सोयीचे होईल, यासाठी नगराध्यक्षांकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. 

तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेताना देणगी प्रवेशिका असल्या तरी तो व्यावसायिक हेतू नसून कार्यक्रमाचा किमान खर्च भागवण्यापुरताच मर्यादित असतो. निधी संकलन करणे कठीण होत असल्याने भाड्यात सवलत मिळाल्यास त्याचा दिलासा नाटक, संगीत कार्यक्रम घेणाऱ्या संस्थांना मिळेल असं मत श्री‌. पुराणिक यांनी व्यक्त केले. तर नाथ पै.  नूतनीकरणानंतर सभागृहाची रचना चांगली असली तरी दैनंदिन देखभालीचा अभाव इथे आहे. मेकअप रूममधील अपुऱ्या सुविधा, स्वच्छतागृहांची अवस्था, सभागृहातील मोडलेल्या २३ खुर्च्या आदींकडे प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नुकताच एका नाटकाच्या वेळी पडदा बंद न होण्यासारख्या घटनांमुळे कलाकारांना त्रास सहन करावा लागला. अनेकदा भाड्याने खुर्च्या-टेबल आणावे लागतात असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सावंतवाडीत झालेल्या काही शासकीय कार्यक्रमांना कमी प्रेक्षक मिळण्यामागे स्थानिक संस्था व कलाकारांशी समन्वयाचा अभाव हे कारण असल्याच दिसले.  मात्र, सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चांगले उपक्रम मंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आम्ही देखील संगीत नाटकांबाबत श्री. शेलार यांचे लक्ष वेधले आहे. येणाऱ्या काळात असे नाट्य महोत्सव जिल्ह्यात देखील होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.