LIVE UPDATES

फोपे यांनी गावासाठी झटून काम केले : पालकमंत्री नितेश राणे

करुळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून दत्तात्रय फोपे यांना वाहिली आदरांजली
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 20:57 PM
views 23  views

कणकवली : करुळ गावचे माजी सरपंच दत्तात्रय फोपे यांनी ३० वर्षे आपल्या करुळ गावात सरपंचपदावर काम करताना आपल्या गावासाठी झटून काम केले. त्यांनी केलेले काम यापुढच्या पिढ्यांसाठी आदर्शवत ठरेल, अशा शब्दात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कै. दत्तात्रय फोपे यांना आदरांजली वाहिली.

करुळ पंचक्रोशीच्यावतीने करुळ येथील बॅ. नाथ पै ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक शाळेच्या सभागृहात ही शोकसभा झाली. या शोकसभेला पालकमंत्री उपस्थित राहिले. त्यांनी फोपे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर ते म्हणाले, त्यांनी केलेले काम हे सर्वज्ञात आहे. खा. नारायण राणे यांचीही भेट घेऊन त्यांनी आपल्या गावचे अनेक प्रश्न सोडविले. त्याशिवाय आमदार असताना माझ्याकडेही त्यांनी अनेक कामांसाठी पाठपुरावा केला. २०१४ सालच्या माझ्या निवडणुकीत त्यांनी संपूर्ण गाव आपल्या अंगणात बोलावून मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्या गावातून मला मोठे मतदान मिळाले अशी आठवणही पालकमंत्र्यांनी सांगितली. 

या शोकसभेला कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर हेही उपस्थित होते. पारकर म्हणाले, फोपे सरपंच म्हणून ते संपूर्ण तालुक्यात ओळखले जात होते. त्यांचे माझ्याशी मैत्रीचे संबंध होते. राजकारणापेक्षा समाजकारण याकडे त्यांचे अधिक लक्ष होते. आपल्या गावातील विकासकामांसाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. राजकारणातही ते आपल्यासोबत कायम राहिले. त्यांचे मार्गदर्शनही आम्हाला होत होते असेही संदेश पारकर म्हणाले.

आदर्श शिक्षक विद्याधर तांबे यांनी शोकसभेच्या सुरुवातीला प्रास्‍ताविकपर मनोगत व्‍यक्‍त केले. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, माजी सभापती बाबा वर्देकर, पत्रकार गणेश जेठे, माजी सभापती संतोष कानडे, माजी जि. प. सदस्य प्रकाश पारकर, माजी जि. प. सभापती नागेश मोरये, करुळच्या सरपंच समृद्धी नर, तिवरे सरपंच भाई आंबेलकर, करुळचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर, सोसायटी चेअरमन वसंत तेंडुलकर, मंगेश कर्णिक, निवृत्त नायब तहसीलदार दिलीप पाटील, जितेंद्र हरयाण यांनी मनोगते व्‍यक्‍त करत फोपे यांना श्रद्धांजली वाहिली.

जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, सरपंच संदीप मेस्‍त्री, मिलिंद मेस्‍त्री यांनीही यावेळी उपस्थित राहून फोपे यांना श्रद्धांजली वाहिली. माजी सभापती संजय शिरसाट तसेच करुळ गावातील सर्व ग्रामस्थ, करुळ पंचक्रोशीतील सर्व सरपंच, तंटामुक्‍ती अध्यक्ष, सहकारी सोसायटींचे संचालक व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.