
कणकवली : पाण्याचा अपव्यय टाळा आणि पाणी वाचवा, असा संदेश सर्वत्र दिला जात असताना कणकवली नगरपंचायतीने शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर आणि मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन तसेच नळ कनेक्शनमधील गळती तातडीने बंद करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शहरातील प्रत्येक वाडी-वस्तीमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये अथवा नळ कनेक्शनमध्ये लिकेज आढळल्यास त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना पाणी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून नगरपंचायतीचे कर्मचारी विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून गळतीच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम करत आहेत.
यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधील पिळणकरवाडी, प्रभाग क्रमांक ८ कांबळे गल्ली, प्रभाग क्रमांक ७ डेगवेकर मिल परिसर, प्रभाग क्रमांक १३ भगवती हॉल परिसर तसेच प्रभाग क्रमांक १५ नरडवे रस्ता आदी भागांमध्ये पाणी गळती दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.
शहरातील सर्व १७ प्रभागांमध्ये पाणीपुरवठा योजनेतील लिकेज शोधून ते तातडीने बंद करण्याची मोहीम सुरू असून, यासाठी नगरपंचायतीचे १४ पाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असल्याने नागरिकांनीही आपल्या नळ कनेक्शनमध्ये गळती आढळल्यास नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










